
नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दरवाढीचा फटका बसला आहे. १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या बदलांमध्ये व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ६२.५० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात (सप्टेंबरमध्ये) दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९.५० रुपयांनी वाढून २,७४७.५० रुपये झाली होती. आज त्यात आणखी ६२.५० रुपयांची भर पडल्याने ती २,८१० रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, पाटणामध्ये या सिलिंडरच्या किमतीत ७१.५० रुपयांची वाढ झाली आहे.
'इंडियन ऑइल'ने जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २,९८३ रुपये झाली आहे. तिथे घरगुती सिलिंडरची किंमत मात्र ९५७.५० रुपये इतकीच कायम आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची वाढ झाली आहे. २,७०१ रुपयांवरून २,७६४ रुपये तर घरगुती सिलिंडरची किंमत ९४१.५० रुपयांवर स्थिर आहे.
अहमदाबादमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २,८३१.५० रुपये झाली आहे, तर घरगुती सिलिंडरची किंमत ९४९ रुपयांवर कायम आहे. कन्याकुमारीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढून ३,०४६ रुपये झाली आहे, तर घरगुती सिलिंडरचा दर १,०२६ रुपयांवर स्थिर आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे १९ किलोच्या सिलिंडरची किंमत वाढून ३,०७३.५० रुपये झाली आहे, तर १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत १,००७.५० रुपयांवर स्थिर आहे.
लेहपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अहमदाबादपासून ईशान्येकडील राज्यांपर्यंत सर्वच भागांत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत, तर १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










