
देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड परिसरात पावसातील अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे भातपिकाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शीतल तावडे तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातपिकाची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पिकाच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेण्यात आली.
चाफेड परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीची योग्य प्रकारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी दिली.
शासन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
यावेळी चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडार, उपसरपंच महेश राणे, शेतकरी दीपक राणे, मंगेश साळकर, दीपक साटम, प्रशांत साटम, वसंत पांचाळ, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.












