
दोडामार्ग : मोर्ले गावचे माजी सरपंच तथा शिवसेना (शिंदे गटाचे) तालुका संघटक गोपाळ सुरेश गवस ( वय ५२ ) यांचे गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यात शोककळा पसरली.
गोपाळ गवस हे सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. मोर्ले-पारगड रस्त्याच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या रस्त्याच्या प्रश्नासाठी विविध स्तरांवर त्यांनी आवाज उठवत ग्रामस्थांच्या मागणीला बळ देण्याचे काम केले.
शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अनेक आंदोलनांमध्ये गवस हे सक्रियपणे सहभागी होत असत. स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने भूमिका घेणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. शिवसेना (शिंदे गट)चे तालुका संघटक म्हणूनही त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांत सहभाग घेतला. आमदार दीपक केसरकर यांचे सच्चे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर गवस यांनी सुरुवातीच्या काळात काहीकाळ भेडशी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे काम केले. त्याचबरोबर ‘आंतरराष्ट्रीय प्रथम’ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण चळवळ राबविण्यातही त्यांनी योगदान दिले.
सामाजिक प्रश्नांबरोबरच गावाच्या विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने सक्रिय असलेल्या गवस यांच्या अकाली निधनाने मोर्ले परिसराने एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय सहकारी तसेच ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.










