
देवगड : ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रांत केलेली भरीव कामगिरी आणि अनुभव नव्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन देवगडच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी केले. देवगड तहसीलदार कार्यालयाच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवगड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून तहसीलदार शीतल जाधव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना फेटे बांधून तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच उदय गोरे, मधुकर गोगटे, विद्याधर कार्लेकर, श्री. लळीत आणि डॉ. गणेश बांदकर यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार शीतल जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या गौरवास्पद जीवनप्रवासाचा उल्लेख करत त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे सांगितले. तरुणपणी विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली भरीव कामगिरी आणि समाजासाठी दिलेले योगदान यामुळे त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. गणेश बांदकर आणि प्रा. सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे नियोजन पूर्वाश्री आचरेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन संदिप हांगे यांनी केले. कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.










