
रत्नागिरी : मतदार याद्यांचे पुनरिक्षण आणि मॅपिंगच्या कामावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेवर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांचे वर्तन हे ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ असेच आहे. निवडणूक जिंकलो की, ईव्हीएम चांगले आणि हरलो की नावे ठेवणे, ही त्यांची जुनी सवय असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
पूर्वी मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकणी असणे, बाहेरील लोकांची नावे समाविष्ट होणे, अशा अनेक त्रुटी होत्या. आता सुरू असलेल्या 'एसआयआर' आणि मॅपिंगच्या कामामुळे या सर्व त्रुटींवर अचूक उपाय शोधला गेला आहे. या प्रक्रियेमुळे बोगस मतदान आणि डुप्लिकेट व्होटिंगला आळा बसत असून, हे काम अतिशय पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे जठार यांनी सांगितले.
देशातील ज्या ज्या राज्यांत विरोधक निवडणुका जिंकतात तिथे ईव्हीएम किंवा यंत्रणा उत्तम असते; मात्र जिथे ते पराभूत होतात तिथे निवडणूक यंत्रणेवर खापर फोडले जाते, असा आरोप करत विरोधकांच्या या भूमिकेमुळे अनेकजण आता बेरोजगार झाल्याचा टोमणाही त्यांनी मारला.
ज्या ठाकरेबंधूंनी आपले एकमत करण्यासाठी तब्बल वीस वर्षे घालवली, जे स्वतःच्या कुटुंबात किंवा पक्षात एकमत घडवून आणू शकले नाहीत आणि ज्यांना एकमेकांची मतेही समजावून घेता येत नाहीत ते संपूर्ण जनतेच्या मतांची काय काळजी करणार? असा सवाल करत आमदार जठार यांनी ठाकरेबंधूंवर उपहासात्मक टीका केली. ज्यांनी हा विरोध उभा केला आहे तो लोकांमध्ये टिकत नसल्यामुळे आता विरोधक नैराश्यातून असे आरोप करत आहेत.














