LIVE UPDATES

देवगड महाविद्यालयात रोजगार महाकुंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

२०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग; विविध कंपन्यांकडून मुलाखती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 17:14 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि आप्पासाहेब गोगटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड येथे करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या रोजगार महाकुंभ मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण विकास मंडळ, देवगड नियामक समितीचे सभापती एकनाथ तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण सुरवसे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगडचे प्रभारी प्राचार्य विरेश सामंत, मंडळ अधिकारी सिद्धेश घाडीगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुनिल पारकर, उद्योजक श्रीधर ओगले आदी उपस्थित होते. या रोजगार महाकुंभाचे आभासी पद्धतीने उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील मार्गदर्शन तसेच रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना व तरुणांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या महारोजगार अभियानात एकाच छताखाली विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना एकत्र आणण्यात आले आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि पात्रतेच्या जोरावर रोजगाराच्या संधी मिळवाव्यात. तरुणांच्या हाताला काम मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटक एकनाथ तेली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोकणच्या भूमीत निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग तरुणांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी करावा. आजच्या तरुणांनी पर्यटनाशी संबंधित उद्योगांकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी बदलत्या रोजगाराच्या संधींचा आढावा घेत तरुणांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.

या रोजगार महाकुंभ मेळाव्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुथूट फायनान्स, फळ प्रक्रिया प्रकल्प (ओगले फूड्स), कळंबा अ‍ॅग्रो, युनिकेअर हेल्थ केअर, एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स, ओन्ली एअर कंडिशनर्स तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड आदी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या.

या रोजगार महाकुंभ मेळाव्याला देवगड तालुक्यातील विविध भागांतून आलेले २०० पेक्षा अधिक युवक-युवती उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली जाधव यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुहास खरात यांनी केले, तर आभार प्रा. प्रल्हाद कांबळे यांनी मानले. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणारा हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.