
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा आता गोव्याप्रमाणेच पर्यटकांना आकर्षित करत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हॉटेल व फळप्रक्रिया या व्यवसायांना उद्योगांचा दर्जा द्यायचा आहे. असा दर्जा दिला तर त्यात अमूलाग्र बदल होईल. पुढील दोन वर्षांत पर्यटनाची माहिती देणारे पर्यटन विकास केंद्रही विकसित करणार आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
हॉटेल विवा येथे रविवारी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) व पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर, समृद्ध कोकणचे संस्थापक संजय यादवराव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री सामंत यांनी राजू भाटलेकर यांचे अभिनंदन केले. सातत्याने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणारे भाटलेकर पर्यटन परिषद, कार्यशाळा घेऊन व्यासपीठ देत असल्याचे सांगून मंत्री म्हणाले की, रत्नागिरीत दिवाळी, ३१ डिसेंबर, शिमगा, गणपती उत्सव आदी काळात हॉटेल्सची ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत हॉटेल्स फुल्ल होती. रत्नागिरीत विमानतळ होणार का, यावर एकेकाळी शंका उपस्थित करून टीका केली जात होती. मात्र, १७० कोटी रुपये खर्च करून येथील एअरस्ट्रिपची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर आणि रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. येथे ८२ सीटर एटीआर विमान सहज उतरू शकेल, जेणेकरून पर्यटनाला अधिक गती मिळेल.
उडाण योजनेअंतर्गत देशात कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग रत्नागिरीत उभारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडते. पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवर मैत्री ग्रुपने तयार केलेला कॉर्न- चीज समोसा यांसारख्या नवीन पदार्थांची आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांची भर पडत आहे.
टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोकणच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी ६ विशेष स्टॉल्स (स्टँड्स) तयार करण्यात आले आहेत. याद्वारे मुंबई किंवा इतर ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांना कोकम सरबत आणि सोलकढी यांसारख्या स्थानिक पदार्थांची ओळख होईल. रत्नागिरी विमानतळावरून आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार असून, नागरिक विमानाने प्रवास करू शकतील, अशी घोषणा मंत्री सामंत यांनी या वेळी केली.
प्रास्ताविकामध्ये सुधीर तथा भाई रिसबूड यांनी कोकणचे पर्यटन, रत्नागिरीत पर्यटन वाढीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या कलाकृती, प्रकल्पांबाबत माहिती दिली. फक्त संकल्पना मांडून नाही तर तर प्रत्यक्षात अमलबजावणी करण्यावर पालकमंत्र्यांचा भर असतो, असे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.
पर्यटन मित्र पुरस्कार वितरण
याप्रसंगी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी मंत्री सामंत यांना विशेष पर्यटन मित्र सन्मान प्रदान केला. सुदेश शेट्ये, सतीश कदम, संजय वैशंपायन, अमृता करंदीकर, ययाती शिवलकर, गौरेश फाळके, गौरव जोशी, महेंद्र मयेकर, प्रसाद देवस्थळी, ओम पाडाळकर, राधेय पंडित, शहनाज काझी, मानसी यादवराव, आनंद तायशेटे, भरत मोरे यांना पर्यटन मित्र पुरस्कार, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन पालकमंत्री डॉ. सामंत व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










