LIVE UPDATES

kolhapur News : विसर्जन मार्गावरून दोन डंपर चपलांसह 30 टन कचऱ्याचा उठाव

गणेश विसर्जन मिरवणूक संपताच कोल्हापूर महापालिकेची स्वच्छता मोहीम; चपला पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 16:21 PM
views 48  views
Kolhapur Ganesh Visarjan Cleanup

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मुख्य विसर्जन मार्ग तसेच रंकाळा परिसरातील स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी पडलेल्या चपला व इतर कचऱ्याचा तातडीने उठाव करण्यात आला. या मोहिमेत सुमारे दोन डंपर इतक्या चपला आणि सुमारे 30 टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला.

मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा बसस्थानक, रंकाळा टॉवर, संध्या मठ, तांबट कमान ते इराणी खण, कळंबा फिल्टर हाऊस ते इराणी खण, साने गुरुजी मेन रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, कसबा बावडा मेन रोड, पंचगंगा घाट रोड, बिंदू चौक, शिवाजी चौक आदी प्रमुख विसर्जन मार्गांची स्वच्छता करण्यात आली.

विशेषतः ताराबाई रोड, महाद्वार रोड तसेच पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर मोठ्या प्रमाणात चपला आढळून आल्या. महापालिकेच्या स्वच्छता पथकांनी सर्व चपलांचा तातडीने उठाव करून त्या कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात संकलित केल्या आहेत. या चपला पुढील प्रक्रियेसाठी रिसायकलिंगला पाठविण्यात येणार आहेत.

तसेच कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरातील घाटाची रात्री दोन वाजताच स्वच्छता करण्यात आली. विसर्जनानंतर नागरिकांना स्वच्छ परिसर उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रीपासूनच स्वच्छता मोहीम सुरू ठेवली.

या स्वच्छता मोहिमेत कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, युवान कोल्हापूर, गार्डन क्लब कोल्हापूर, गोखले कॉलेजचे विद्यार्थी, क्लीन कोल्हापूर क्लब, ग्रीन सृष्टी सोशल वर्क फाउंडेशनअंतर्गत प्लास्टिकमुक्त कचरा अभियान, कोल्हापूर प्रबोधिनी क्लासेस, सायकल वेडे कोल्हापूर आणि गडकोट गिर्यारोहक संस्था यांचे स्वयंसेवक सहभागी झाले.

महापालिकेच्या वतीने मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक विनोद नाईक, पूनम जाधव, मनोज लोट, माधवी मसुरकर, आनंद बावडेकर, दिलीप पाटणकर, राकेश लोखंडे, मुकादम तसेच सुमारे 350 स्वच्छता कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.