
कुडाळ : राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये 'ट्रिगर १' अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५ दिवसांत तब्बल १० हजार वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या विशेष पाणी संवर्धन मोहिमेचा शुभारंभ अणाव येथून करण्यात आला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाला 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात ६,५०० कच्चे बंधारे बांधले जातात. मात्र, यंदाच्या दुष्काळाचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सप्टेंबर अखेरीसच १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. रोटरी क्लब आणि सविता आश्रम यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.
अणाव येथे आयोजित शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, कुडाळचे गटविकास अधिकारी प्रवीण हिरलेकर, कृषी अधिकारी संदेश परब, सविता आश्रमचे संदीप परब, रोटरी क्लब सेक्रेटरी राकेश म्हडदळकर, अभिषेक माने, राजीव पवार तसेच अणावचे सरपंच लीलाधर आणावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विनायक आणावकर, महेश परब, मृणाल परब, सुवर्णा परब, आदिती आणावकर, किरण आंगणे यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये लोकसहभागातून हे १० हजार वनराई बंधारे उभारले जाणार असून, मे महिन्यापर्यंतची पाणीटंचाई रोखण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ताजी बातमी
View all











