
मालवण : खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार ही केवळ एक अफवा असू शकते. गुणवत्तेवर असे होऊ शकत नाही आणि महायुतीमध्ये अशा कोणत्याही चर्चा सुरू नसल्याचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
'निलरत्न' बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, विकी तोरसकर, बाबा परब, जॉन नरोन्हा आणि मंदार लुडबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी राज्यासह राष्ट्रीय राजकारणातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, संजय राऊत काय बोलले हे मला माहीत नाही, ते वेडे झाले आहेत. उद्या अमेरिकेत जे काही सुरू आहे, ते माझ्यामुळेच सुरू आहे असेही ते म्हणतील, त्यामुळे त्यांच्या विधानांना उत्तरे देण्याची गरज नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेवरून राहुल गांधींवर निशाणा साधताना राणे म्हणाले की, "२००९ मध्ये डिलिमिटेशन झाल्यानंतरच मी काँग्रेसचा खासदार झालो होतो. लोकसंख्या बदलली किंवा स्थलांतर झाले तर डिलिमिटेशन करावेच लागते. ते काँग्रेसच्याच काळात झाले, मग काँग्रेसला देशद्रोही जाहीर करायचे का? सभागृह न चालण्यास राहुल गांधी जबाबदार असून, डिलिमिटेशन देशद्रोही कसे, हे त्यांनी सभागृहात मांडावे."
सीजेपीच्या सौरभ दासवर लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, ते योग्यच असल्याचे राणे म्हणाले. "हे देशविरोधी कारवाया करणारे लोक आहेत. लंडनचे तिकीट ५ लाखांच्या खाली नाही. हा कुठे नोकरीला आहे? याचे कोणते भाषण गाजले की याला लंडनला बोलावले? यांना परदेशात कोण पाठवते आणि हे तिकडे कोणाला भेटतात, याची चौकशी झाली पाहिजे," असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशभरात क्रेझ असून अनेक जण पक्षात येत आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जिथे मागणी असेल तिथे, अगदी गोवा आणि उत्तर प्रदेशातही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे राणे यांनी स्पष्ट केले.
शक्तिपीठ मार्गाबाबत प्रशासनाने स्थानिक लोकांशी एकदा नाही तर अनेकदा चर्चा करून त्यांचे म्हणणे आणि विरोध ऐकून घेतला पाहिजे. संवादातूनच यावर मार्ग काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. जोपर्यंत स्थानिक लोक सांगत नाहीत, तोपर्यंत सी वर्ल्ड प्रकल्प होणार नाही. मी स्वतःहून हा प्रकल्प करणार नाही. पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी १०० दिवसांत सी वर्ल्ड प्रकल्प रद्द करू असे आश्वासन दिले होते, पण अद्याप त्याची अधिसूचना रद्द झालेली नाही. टाळंबा प्रकल्पाबाबतही अशीच फसवणूक करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हायरल केलेल्या पैशांच्या व्हिडीओवर बोलताना निलेश राणे यांनी या व्हिडीओची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली. "निवडणूक होऊन दोन वर्षे झाली आहेत, हा व्हिडीओ एडिट केला आहे का हे तपासले पाहिजे. राजगड कार्यालयात मनसेच्याच एका कार्यकर्त्याला मारहाण झाली होती, त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर आहे, तो देशपांडे यांनी आधी पाहावा. रोज उठून तथ्यहीन आरोप करण्यापेक्षा ती पैशांची बॅग कोणी आणि कशासाठी दिली, याचा तपास झाला पाहिजे," असे आव्हान राणे यांनी दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








