
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. देवगडसमोरील समुद्रात मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदा ट्रॉलिंग करणाऱ्या कर्नाटकातील मलप्पे बंदराच्या ‘श्री अनघा’ या हायस्पीड ट्रॉलरला पकडून जप्त करण्यात आले. गस्ती नौका दिसताच वेगाने पळ काढणाऱ्या या ट्रॉलरचा सुमारे तासभर थरारक पाठलाग करून अखेर तिला ताब्यात घेण्यात आले. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते.
२३ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १२.२५ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला देवगडपासून ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘श्री अनघा’ ट्रॉलर वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका ‘शीतल’ दिसताच ट्रॉलरने वेग वाढवून अंधारात पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करणाऱ्या गस्ती नौकेच्या दिशेने दोरखंड आणि जाळे फेकण्यात आले. त्यामुळे गस्ती नौकेच्या प्रोपेलरमध्ये जाळे अडकण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, पथकाने प्रसंगावधान राखत तांत्रिक कौशल्याच्या जोरावर पाठलाग सुरू ठेवला. अखेर सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर ही ट्रॉलर ताब्यात घेण्यात आली.
देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत नौका जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कारवाईचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘श्री अनघा’ (SHRI ANAGHA) असून तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-5927 असा आहे. मिथुन सुवर्णा (रा. कालमाडी बोट्टला, मल्पी, कोडावूर, उडपी) हे या नौकेचे मालक आहेत.
देवगड आणि मालवण परिसरातील स्थानिक मच्छिमारांकडून परराज्यांतील हायस्पीड ट्रॉलरच्या घुसखोरीबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. या नौकांमुळे स्थानिक मच्छिमारांची जाळी फाटून आर्थिक नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
या कारवाईत किरण वाघमारे यांच्यासह सागरी सुरक्षा रक्षक संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर, योगेश फाटक, अमित बांधकर आणि स्वप्नील सावजी यांनी सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईनंतर किरण वाघमारे यांनी स्थानिक मच्छिमारांचे हित आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण हे विभागाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कोणत्याही नौकेची गय केली जाणार नाही. रात्रीच्या वेळीही गस्त आणि कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या बेकायदा मासेमारीविरोधातील कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.








