
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने जवळच्या रक्तसंबंधांमधील विवाहांबाबत केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. अशा विवाहांवर चिंता व्यक्त करत रक्ताच्या नात्यातील व्यक्तींमधील विवाहांमुळे जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, कोणाशी विवाह करायचा हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे आणि न्यायालय त्यावर बंदी लादू शकत नाही. रक्तसंबंधांमधील विवाह अशा विवाहांवर थेट बंदी घालू शकत नाही. परंतु अशा विवाहांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करणे हे संसदेच्या अधिकारक्षेत्रात येते. अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी एखादा कायदा आणता येईल का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.
बेंगळुरू येथील एका दृष्टिहीन विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे आई-वडील एकमेकांचे जवळचे रक्ताचे नातेवाईक आहेत आणि तिला असलेला जन्मजात अनुवांशिक आजार याच कारणामुळे झाला असावा, असे तिचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की मात्र, जवळच्या रक्तसंबंधांमधील विवाहांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात हे मान्य करत न्यायालयाने म्हटले की, या जोखमींबाबत जनतेला माहिती दिली पाहिजे. न्यायालयाने केंद्र सरकारला अशा विवाहांवर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलण्यास किंवा त्याबाबत जनजागृती मोहीम राबवण्यास सुचवले आहे.
याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जवळच्या रक्तसंबंधांमधील विवाह तुलनेने सामान्य आहेत. एकूण विवाहांपैकी सुमारे ३० टक्के विवाह अशा प्रकारचे असतात. या प्रथेमुळे अनेकदा आरोग्याशी संबंधित गुंतागुंत निर्माण होते.
यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सूचना दिली की, अंगणवाडी किंवा पंचायतींसारख्या स्थानिक स्तरांवर जनजागृती केली जावी. या चिंतेमागची वैज्ञानिक कारणे आणि त्यामागची वस्तुस्थिती जनतेपर्यंत स्पष्टपणे पोहोचवली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








