LIVE UPDATES

Sawantwadi Multispeciality Hospital : नगराध्यक्षा म्हणून श्रद्धाराजे सक्षम

कारभारात माझा कोणताही हस्तक्षेप नाही : युवराज लखमराजे भोंसले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 07:37 PM
views 17  views
Yuvraj Lakhamraje Bhosale addressing a press conference in Sawantwadi about the multispeciality hospital project and city development.

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटीचा जमीन प्रश्न मार्गी लागला असून पुढील कार्यवाही आमदार दीपक केसरकर करत आहेत. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पालकमंत्री नितेश राणे यांचा देखील त्यावर लक्ष आहे. या जागेची विभागणी झाली असून राजघराण्याकडून लागणारी मदत केली जाईल अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली.

तसेच नगरपरिषदेच्या कारभारात माझा कोणताही हस्तक्षेप नाही. मी कधीही तिथे येत नाही. नगराध्यक्षा म्हणून श्रद्धाराजे सक्षम आहेत. त्या स्वतः निर्णय घेतात. विनाकारण गैरसमज केले जात असतील तर ते योग्य नाही असं मत श्री. भोसले यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. 

युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, मोती तलावातील आजची परिस्थिती ही ५ ते १० वर्षांतील दुर्लक्षामुळे आहे. ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. काही इमारतीत सांडपाणी व्यवस्थापन न केल्याचे हे परिणाम आहेत. मात्र, आता यासाठी नगराध्यक्षा व नगरसेवकांनी लक्ष घातलं असून मोती तलाव स्वच्छतेसही प्रारंभ केला आहे.

प्रशासनाकडून संबंधित इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. तर कामासाठी खोदलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांकडे कामगारांची कमतरता होती. त्यामुळे याला थोडा वेळ गेला. मात्र, आता कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. परंतु, आज या अडचणीला सामोरे गेल्याने भविष्यात पाणी, गॅस आपल्या घरापर्यंत येणार आहे. रस्त्याच काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भाजप म्हणून आमचा प्रयत्न आहे अशी माहिती श्री. भोसले यांनी दिली. 

तसेच नगरपरिषदेच्या कारभारात माझा कोणताही हस्तक्षेप नसतो. मी कधीही तिथे येत नाही. नगराध्यक्षा म्हणून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या सक्षम आहेत. त्या स्वतः निर्णय घेतात. काही गोष्टीत मी, पक्ष सल्ला देतो. पण, निर्णय घेण्याच काम त्याच करतात. मोती तलाव, रामेश्वर प्लाझा येथील विषयाबाबतच नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क करतो. या व्यतिरिक्त राजवाड्यात येणारे एक, दोन ठेकेदार हे आमच्या कामांसाठी येतात‌. नगरपरिषदेच्या ठेक्यासह हे ठेकेदार प्रायव्हेट काम देखील घेतात. त्यामुळे यावरून लोकांचा गैरसमज कुणी करत असेल तर ते चुकीचे आहे.

माझा कोणताही हस्तक्षेप नगराध्यक्षांच्या कारभारात नसून सावंतवाडीच्या विकासासाठी एक नागरिक म्हणून सल्ला देण्याच काम मी करतो असंही त्यांनी स्पष्ट केले. तर, शहरात पर्यटक येत आहेत. लोकांकडे गाड्या वाढल्या आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होते. पर्यटक येण ही चांगली बाब असून त्याकडे सकारात्मपणे बघणं आवश्यक आहे. रस्ते मोठा करणं आता शक्य नाही. पण, वन-वेचा निर्णय नगरपरिषद प्रशासनान घेतला आहे. पोलिसांकडून त्यावर उपाययोजना केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, नळपाणी योजना पूर्ण होण आवश्यक आहे. कामाच्या दर्जाबाबत मी बोलू शकत नाही, त्यातील मी तज्ञ नाही. त्यासाठी पीएमसी नेमलेली आहे. ते त्यावर योग्य ती माहिती देतील. परंतु, काम पूर्ण झालं नाही तर लोकांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे हे काम होत असताना त्यावर गांभीर्याने लक्ष ठेऊन काम पुर्ण करून घेणं आवश्यक आहे. नगराध्यक्ष, नगरसेवकांच लक्ष त्यावर आहे. येणाऱ्या काळात हे पाणी शहरवासीयांसाठी महत्वाच ठरणार आहे. लोकांनी देखील कामावर लक्ष ठेवत काम पूर्ण करून घ्याव. अन्यथा, पाणी पोहचण्यासाठी भविष्यात समस्या निर्माण होतील असंही श्री. भोसले यांनी सांगितले‌.