
देवगड : गुजरातमधील वलसाड येथील आंब्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवून देण्यासाठी तेथील कृषी विद्यापीठांकडून प्रयत्न सुरू असल्याने कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘हापूस’ या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि कोकणच्या हापूसची स्वतंत्र ओळख व हक्क अबाधित ठेवण्यासाठी कोकणातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी आणि संघटनांनी एकजूट होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी देवगड येथे पहिली आंबा परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेतून हापूसच्या संरक्षणासाठी व्यापक लढ्याची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती आंबा बागायतदार गणेश गावकर आणि काका ढोके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुजरातमधील वलसाडच्या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली असून, ३० ऑक्टोबर रोजी पहिली जनसुनावणी झाली. त्यानंतर चेन्नई येथील जीआय रजिस्ट्री कार्यालयात गुजरातमधील वलसाड आणि महाराष्ट्रातील कोकण हापूस यांच्या दाव्यांसंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीत कार्यालयाने निर्णय राखून ठेवला असून, दोन्ही राज्यांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, असे सुचविल्याचे गावकर आणि ढोके यांनी सांगितले.
भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी संबंधित उत्पादनाचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र, तेथील माती, हवामान आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये यांचा विचार केला जातो. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) निकषांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच हे मानांकन दिले जाते. महाराष्ट्रात सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर आंबा उत्पादन घेतले जाते. त्यापैकी सुमारे एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र कोकणात आहे. प्रदीर्घ कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रियेनंतर २०१८ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांतील हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाले होते. यापूर्वी कोकणातील काजू आणि कोकमलाही जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.
हापूस नावाच्या वापरावरून वादाची शक्यता
वलसाडच्या आंब्याला जीआय मानांकन मिळण्यापेक्षा ‘हापूस’ (अल्फान्सो) या नावाच्या वापराचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे गावकर आणि ढोके यांनी स्पष्ट केले. गोव्यातील आंब्याच्या दोन जातींना जीआय मानांकन मिळाले असले तरी त्यांना ‘हिलारिओ (गोवा)’ आणि ‘मुसराद (गोवा)’ अशी स्वतंत्र नावे देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर वलसाडच्या आंब्यालाही स्वतंत्र नाव असावे. ‘हापूस’ या नावाचा वापर करून बाजारपेठेत कोकणच्या हापूसशी स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या विषयावर राजकीय पातळीवर पुरेशी स्पष्टता दिसत नसल्याची टीका काका ढोके यांनी केली. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी संघटनांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग फळ बागायतदार शेतकरी संघ या लढ्यात पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील हापूसला लाभलेली चव, गुणवत्ता आणि वैशिष्ट्ये ही येथील माती व हवामानाशी निगडित आहेत. त्यामुळे कोकणच्या हापूसची ओळख आणि त्याचे व्यावसायिक हित जपण्यासाठी सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी ३ डिसेंबरच्या आंबा परिषदेला कोकणातील शेतकरी, बागायतदार आणि विविध शेतकरी संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश गावकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








