
पालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ६५ वे राज्यस्तरीय अधिवेशन पालघर जिल्ह्यातील डहाणू-बोर्डी येथे उत्साहात सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक संघाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल चार लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दरवर्षीप्रमाणे एक लाख रुपयांची देणगी देण्याची परंपरा कायम ठेवत, यंदा अधिवेशन त्यांच्या मतदारसंघात होत असल्याने अतिरिक्त एक लाख रुपये असे एकूण दोन लाख रुपये दिले. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दोन लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
याशिवाय पुणे शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनीही अधिवेशनासाठी दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात उद्घाटनानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या ६५ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बी. बी. पाटील, स्वागताध्यक्ष श्री. राऊत, विद्यार्थी सभागृहाचे अध्यक्ष एन. के. पाटील, महामंडळाचे विश्वस्त व सल्लागार सुभाष माने, जे. के. पाटील, महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सचिन नलावडे, घुगरे सर, पंडित सर, कोषाध्यक्ष संदेश राऊत, विद्या समितीचे सचिव संजयकुमार झांबरे, मागील अधिवेशनाचे अध्यक्ष मुकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या अधिवेशनाचे आयोजन करणारे पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, सचिव अरुण भोईर, माणिक दोतोंडे, विठ्ठल गोरे, सविता किनी, महेश कडू, प्रमोद पाटील तसेच मुख्याध्यापक संघाचे सल्लागार चंद्रकांत पवार, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील आणि सचिव प्रवीण लोंढे,सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांच्यासह राज्यभरातून आलेले मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, मुख्याध्यापकांच्या समस्या आणि शैक्षणिक धोरणांवर विचारमंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








