
सिंधुदुर्ग : मायभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारा सैनिक आणि त्याच्या मनगटावर विश्वासाचे कवच बांधणारी बहीण... रक्षाबंधनाचा सण म्हणजे केवळ रेशमी धाग्यांचे नाते नसून त्याग, समर्पण आणि पराक्रमाचा अद्वितीय संगम आहे. कारिवडे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत यांनी पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शत्रूचे ड्रोन आकाशातच उद्ध्वस्त करत देशाचे रक्षण केले. घराण्यातील सैनिकी वारसा, आई-वडिलांचे संस्कार आणि ‘देश प्रथम’ या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन १७ व्या वर्षी सैन्यात पाऊल ठेवणाऱ्या या वीरपुत्राची यशोगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. सीमेवर तैनात असताना ३० वर्षे बहिणीच्या प्रत्यक्ष सहवासापासून दूर राहिलेल्या, पण तिने पाठवलेली पत्रे आणि राख्या काळजाशी जपणाऱ्या एका खऱ्या सैनिकाची ही शौर्यगाथा !
देशाची ‘रक्षा’ करताना एक ‘बंधन’ त्यांनी नेहमी पाळले...ते म्हणजे, देशाचे संरक्षण. या बंधनाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे कारिवडे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्निक दलाचे निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत यांच्याशी रक्षाबंधनानिमित्त केलेली ही खास बातचीत....
आर्मीची क्रेझ लहानपणापासूनच....
वडील आणि आजोबांपासूनच घराण्याला सैनिकी वारसा लाभला . देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे आजोबांनी लहानपणीच मनात भिनवले होते. त्यामुळे पुढे जाऊन देशासाठी जगले पाहिजे ही भावना निर्माण होत गेली. त्यामुळे देशसेवा करून आर्मीची वर्दी अंगावर घालायचीच हे एकच ध्येय बनले आणि कालांतराने ते ध्येय पूर्णही झाल्याची भावना संजय सावंत यांनी दैनिक कोकणसादशी बोलताना व्यक्त केली.
पोस्टमनचे पत्र आणि आईच्या डोळ्यात आनंदाश्रू....
जेव्हा भरती झालो तेव्हा कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होतो. कुटुंबापासून दूर जाण्याची ही पहिलीच वेळ होती. कारिवडे गावच्या पोस्टमनचे पत्र आले ते पत्र आपण रस्त्यातच वाचून बघितले तेव्हा आपण भारतीय सैन्य दलात भरती ते पत्र होते. आपला पोरगा पहिल्यांदाच दूर जाणार या भावेनेने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. त्यानंतर कोल्हापूर आणि मग नाशिक असा सुरुवातीच्या पोस्टिंगच्या काळातील मुक्काम होता. वयाच्या १७ व्या वर्षी काहीच माहित नव्हते . पण , देशसेवेसाठी जातोय ही भावना मनात होती आणि दुसऱ्या बाजूला आई - वडिलांना सोडून दूर जातोय हे दुखःही होतं अशी भावना सावंत यांनी केली .
देशसेवेत कुटुंबाचा आधार महत्वाचा...
आईचा एकच सल्ला होता तो म्हणजे देश प्रथम... काहीही झालं तरी देशसेवेला प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि हेच वाक्य आपल्या अंगांअंगात भिनलं होतं. त्यामुळे देशसेवेचे व्रत हाती घेत असताना कुटुंबाचा आधार महत्वाचा असल्याचा निवृत्त सुभेदार मेजर आवर्जून सांगतात.
रक्षाबंधन काय हे सीमेवर गेल्यावरच कळले...
बहिणीची माया काय असते ही बहिणीपासून दूर गेल्यावरच कळते . भरती होऊन सैन्यात जातो तेव्हा पत्राची वाट बघत बसायचो. काही वेळा पत्र लगेच भेटायचे देखील नाही असेही प्रसंग पाहिले आहेत. सैन्यात भरती झाल्यापासून बहिणींनी पाठवलेली पत्र आणि राख्या आपण आजही आपल्यासोबत साठवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. ३० वर्षात प्रत्यक्ष रक्षाबंधनाचा योग आला नाही. परंतु, निवृत्तीनंतरची ही आपले पहिले रक्षाबंधन असल्याचे सांगत हे रक्षाबंधन आपल्यासाठी खास असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला जवान आपली बहिण मानत असतो आणि पुढेही मानत राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली .
ऑपरेशन सिंदूर मध्ये १० मीटर अंतरावर कोसळले ड्रोन...
पाकिस्तान विरुद्ध लढल्या गेलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये केवळ १० मीटर अंतरावर शत्रूंचे ड्रोन कोसळले. त्यावेळी आपण मरणातून वाचलो. तो क्षण आजही आठवला तरी अंगावर शहारे उभे राहतात. परंतु पाकिस्तानी सैन्याला ऑपरेशन सिंदूरमधून भारताची ताकद आणि जवानांचे मनोबल काय असते हे आपण दाखवून दिले.
देशाला बाहेरच्यांनी नाही आतल्यांनी पोखरलं...
देशाचा दुश्मन नवीन पिढीला बरबाद करून आपला स्वार्थ साधत आहे. सीमेबाहेरील लोकांबरोबरच देशाला आतल्या लोकांनीही पोखरून टाकलय. देशातील तरुण जर देश विघातक कृत्यांमध्ये सामील होऊ लागली तर देशाची प्रगती कुठेतरी थांबेल. आजच्या तरुणांनी राष्ट्र प्रथम ठेवल पाहिजे तरच देशाची प्रगती होईल असे ते म्हणाले.
आतला सैनिक मरत नाही...
सैनिक हा सैनिक असतो... सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही सैनिक सैनिकच राहतो तो कधीही मरत नाही. सिंधुदुर्गातील तरुणांनाही सैनिकी मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्वखुशीने मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. आपण पुढील काळात तरुण पिढीला नशामुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे ते म्हणाले.














