
सिंधुदुर्ग : रात्रीच्या गडद अंधारात जशी एखादी भयानक सावली अंगावर यावी, काळजाचा ठोका चुकावा अन् दुसऱ्याच क्षणी श्री दत्तात्रेयांच्या जयघोषाने आसमंत उजळून निघावा... असाच काहीसा थरारक, अंगावर काटा आणणारा अन् तितकाच भक्तिमय अनुभव प्रेक्षकांनी घेतला! सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, आवेरे आयोजित ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ या महानाटकाचे आतापर्यंत १५० प्रयोग साकारून अक्षरशः इतिहास घडवला आहे.
कर्नाटक राज्यातील भीमा आणि अमरजा नदीच्या पवित्र संगमावरील ‘अष्टतीर्थां’चे अलौकिक अधिष्ठान अन् गाणगापूरची अगाध महिमा या नाटकाच्या पटलावर जिवंत झाली आहे. अष्टकुंडांमधील स्नानाचे पुण्य आणि साक्षात दत्तप्रभूंच्या उपस्थितीची अनुभूती देणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांना भक्तीच्या उच्च शिखरावर नेले.
‘ती’ येते अन् काळजाचे पाणी होते!
नाटकातील सर्वात मोठा आकर्षण आणि थराराचा केंद्रबिंदू ठरत आहे, ती म्हणजे 'हडळ'. प्रमोद आकेरकर यांनी साकारलेली हडळीची भूमिका इतकी जिवंत आणि अंगावर शहारे आणणारी आहे की, ती मंचावर येताच सन्नाटा पसरतो. भूत म्हणजे नेमके काय? या गूढ प्रश्नाचे थरारक स्पष्टीकरण आकेरकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभे केले. त्यांचा तो भयावह वावर आणि संवादफेकीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच भंबेरी उडते
मनोरंजनातून जनजागृतीचा संदेश
केवळ भीती आणि पात्रांची भुलभुलैया दाखवणे हा या नाटकाचा उद्देश नसून, अंध:श्रद्धेवर मात करत ईश्वरभक्ती आणि सन्मार्गाचा संदेश देणे हाच या कथानकाचा मुख्य गाभा आहे. भितीच्या काळोखातून श्रद्धेच्या प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरला आहे.
लेखक
स्वप्नील परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद














