
वैभववाडी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य विभागाने शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवाचा सण स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडावा, यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत सज्ज झाली. गणेशोत्सवापूर्वी शहरातील मुख्य रस्ते, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्ग तसेच विविध गल्लीबोळांची नियमित व सखोल साफसफाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर रस्त्यांच्या दुतर्फा तसेच सार्वजनिक मोकळ्या जागांवर वाढलेले गवत छाटण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना व गणेशभक्तांना गणेशोत्सव काळात स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने विविध प्रभागांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि मुख्य वस्त्यांमध्ये धूरफवारणी (फॉगिंग) व औषध फवारणी करण्यात येत आहे. कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काळात नागरिकांनी घरातील तसेच परिसरातील कचरा उघड्यावर न टाकता नगरपंचायतीच्या कचरा संकलन गाडीतच द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे आणि स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी केले आहे.










