
सिंधुदुर्गनगरी : रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातील उपहारगृहातच अन्नसुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपहारगृहातील मिसळ पावमध्ये मृत झुरळ आढळून आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी अचानक धाड टाकून तपासणी केली. या तपासणीत खाद्यपदार्थ व साहित्यामध्ये झुरळांचा वावर, साखरेमध्ये मुंग्या, प्रचंड अस्वच्छता आणि कीटक नियंत्रणाची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित उपहारगृहाचा परवाना सुधारणा होईपर्यंत निलंबित करून उपहारगृह सील केले.
गुरुवारी एका रुग्णाच्या नातेवाईकाला उपहारगृहातून घेतलेल्या खाद्यपदार्थात मृत झुरळ आढळले. रुग्णालय परिसरातील उपहारगृहातच असा प्रकार घडल्याने संतप्त तक्रारदाराने थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी (२८ ऑगस्ट) उपहारगृहाची झाडाझडती घेतली.
तपासणीदरम्यान उपहारगृहातील अस्वच्छता पाहून अधिकारीही चक्रावले. खाद्यपदार्थ व साहित्यामध्ये झुरळे आढळली, तर साखरेच्या साठ्यामध्ये मुंग्यांचा वावर दिसून आला. अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. विशेष म्हणजे, उपहारगृहात काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.
दोन वर्षांपासून करार संपला, तरी उपहारगृह सुरूच!
या कारवाईत आणखी एक गंभीर बाब समोर आली. उपहारगृहाचा करारनामा तब्बल दोन वर्षांपूर्वीच संपलेला असल्याची माहिती तपासणीत पुढे आली. उपहारगृहाचे परवानाधारक सुनील जाधव असून, पराग नलावडे हे ते चालवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे करार संपल्यानंतरही उपहारगृह कोणत्या आधारावर सुरू होते, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उपहारगृहातून विविध खाद्यपदार्थ व अन्य साहित्याचे नमुने घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, नमुने दोषी आढळल्यास संबंधितांविरोधात आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे. त्रुटी दूर करण्यासाठी संबंधितांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
रुग्णालयातच अन्नसुरक्षेचा बोजवारा!
उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक विश्वासाने ज्या उपहारगृहातून अन्नपदार्थ घेतात, त्याच ठिकाणी झुरळे, मुंग्या आणि अस्वच्छता आढळल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी निगडित परिसरातच अन्नसुरक्षेचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
“तक्रारदाराच्या तक्रारीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील रुग्णालयाच्या उपहारगृहाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अस्वच्छता, झुरळे आदी अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे संबंधिताला सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली असून, सुधारणा होईपर्यंत परवाना निलंबित करण्यात आला आहे. सुधारणा केल्यानंतर पुन्हा पाहणी करून पुढील निर्देश दिले जातील.”
— ललित गायकवाड, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग










