
सिंधुदुर्ग : २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ८ लाख ४९ हजार ६५१ लोकसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल १ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक नोंदवले गेले होते. आज जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या १० ते १२ टक्क्यांहून अधिक वाटा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. जागतिक पातळीवर २०५० पर्यंत भारत हा ३६ टक्क्यांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असणारा देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सिंधुदुर्गात मात्र ही परिस्थिती आजच अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बनली आहे.
सिंधुदुर्गातील ज्येष्ठांची संख्या वाढण्यामागे आणि एकूण लोकसंख्या घटण्यामागे तरुणांचे प्रचंड प्रमाणात होणारे स्थलांतर हे मुख्य कारण आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांकडे असलेला तरुणांचा वाढता ओढा, तसेच अवघ्या १०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या गोवा, बेळगाव, कोल्हापूर आणि रत्नागिरी या शेजारील शहरांमध्ये रोजगार व शिक्षणासाठी होणारे स्थलांतर यामुळे जिल्ह्यातील तरुण पिढी बाहेर पडली आहे. आरोग्य खात्याच्या अंदाजानुसार गेल्या १५ वर्षांत सिंधुदुर्गची लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली असून गावात केवळ वृद्ध माता-पिता मागे उरले आहेत. त्यातच पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रसार झाल्याने आणि पाल्यांमध्ये आई-वडिलांची जबाबदारी नकोशी वाटण्याची प्रवृत्ती वाढल्याने वृद्धांना एकाकीपणाचे जिणे जगावे लागत आहे.
या वाढत्या वयोवृद्ध लोकसंख्येसोबतच त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत. गावात किंवा वाडीत एकट्या राहणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करून होणाऱ्या चोऱ्या व हल्ल्यांमुळे असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दुर्गम भागात तात्काळ वैद्यकीय सुविधा न मिळणे, गंभीर आजारांच्या उपचारासाठी शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागणे आणि आर्थिक परावलंबित्व यामुळे त्यांचे हाल होत आहेत. तसेच मुलांशी तुटलेला संवाद आणि वृद्धाश्रमात पाठवले जाण्याची भीती यामुळे ज्येष्ठांमध्ये मानसिक नैराश्य व एकाकीपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासन आणि समाजाने एकत्र येऊन बहुआयामी उपाययोजना राबवणे काळाची गरज आहे. पोलीस प्रशासनाने प्रत्येक ठाण्यात 'ज्येष्ठ नागरिक कक्ष' स्थापन करून एकट्या राहणाऱ्या वृद्धांची नियमित नोंदणी करावी व बीट अंमलदारांमार्फत त्यांच्या घरी नियमित भेटी देऊन सुरक्षेची खात्री करावी. आरोग्य विभागाने तालुका स्तरावर विशेष ज्येष्ठ नागरिक उपचार केंद्रे आणि दुर्गम भागांसाठी फिरते दवाखाने सुरु करणे गरजेचे आहे. सामाजिक पातळीवर ज्येष्ठांमधील एकाकीपणा घालवण्यासाठी गावागावांत 'डे-केअर सेंटर्स' किंवा आनंद केंद्रे उभी केली पाहिजेत, जिथे त्यांना एकत्र येऊन संवाद साधता येईल. तसेच 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक देखभाल कायद्याची' कडक अंमलबजावणी करून पाल्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करून तरुणांचे स्थलांतर रोखणे आणि समाजात ज्येष्ठांप्रती आदराची भावना जपणे हाच या समस्येवरील खरा आणि शाश्वत उपाय ठरेल.
वाढत्या ज्येष्ठांमागील प्रमुख कारणे
१) मुंबई आणि पुण्यासह अवघ्या १०० किमीच्या परिघात असलेल्या गोवा, बेळगाव, कोल्हापूर व रत्नागिरी या शहरांमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे.
२) आरोग्य खात्याच्या अंदाजानुसार गेल्या १५ वर्षांत सिंधुदुर्गाची एकूण लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली आहे. तरुणांच्या स्थलांतरामुळे जिल्ह्यात केवळ वृद्ध पिढीच उरल्याचे चित्र आहे.
३) पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून छोटी विभक्त कुटुंबे तयार झाल्याने, उदरनिर्वाहासाठी बाहेर गेलेल्या मुलांमागे गावातील आई-वडिलांवर एकाकी जगण्याची वेळ आली आहे.
लेखक : स्वप्नील परब / सिंधुदुर्ग














