
प्रेरणा नावाची माझी Gen Z मैत्रीण आहे. माणसांमध्ये राहणारी, Genuinely लोकांना मदत करणारी, माणसांचे सर्कल मोठे ठेवणारी आणि स्वावलंबी. मोबाईल साधाच वापरते. साधारणपणे सॅमसंगचा 15000 चा असेल. तिचे वडील तिला बोलले तू आयफोन घे मी देतो पैसे. ती बोलली अजिबात नाही. मी स्वतःची स्वतः तेवढे पैसे कमावणार आणि घेणार तुम्ही मला पैसे द्यायचे नाहीत.
हर्षवर्धन नावाचा Gen Z मित्र. घरच्या परिस्थितीची जाणीव असणारा आणि अतिशय स्वतःच्या गरजा कमी ठेवणारा. मोटोरोलाचा मोबाईल काहीतरी दोन तीन वर्षांपूर्वी घेतला होता. अजून तोच मोबाईल पुढचे पाच वर्षे पण चालवण्याची त्याची तयारी आहे. इतकं असून सुद्धा मी जर त्याला आज येत्या काही महिन्यांमध्ये लॉन्च होणारा आयफोन घेण्यासाठी पैसे उसने मागितले तर कुठूनही मला अगदी लाख दोन लाख रुपये सुद्धा गोळा करून देईल कारण तशा पद्धतीचे त्याचे माणसांचे सर्कल आहे पण म्हणून त्या सर्कलचा उपयोग करून तो स्वतःसाठी असले महागडे मोबाईल फोन घेण्याचा विचारही करू शकणार नाही.
ही दोन फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत असे बरेच लोक माझ्या सर्कलमध्ये आहेत.
पिढी कुठल्या काळामध्ये जन्माला आली आहे याच्यावर त्याचे मूल्यमापन ठरत नाही. कितीतरी Genz लोक अतिशय कष्टाळू आहेत स्वाभिमानी आहेत लहान वयामध्ये पैसा कमवायला आणि सेविंग करायला शिकलेले आहेत.
कड्यावर जाऊन अतिशय डिप्रेशन मध्ये आता मी आत्महत्या करतो असं म्हणण्यासाठी फक्त आई बापाने लाडावून ठेवले आहे इतके वाक्य पुरेसे नसते. वडील मुरलीधर चांदगुडे ट्रक चालक होते. सतत बाहेर असायचे. घरी आले की सतत भांडणे व्हायची. घरामध्ये कुटुंब म्हणून असणारा जिव्हाळा ओलावा कितपत असेल नसेल माहित नाही. कुणाल चांदगुडे बापापेक्षा आईला कनेक्ट होता असं किमान सकृत दर्शनी तरी मला वाटत आहे. कारण आईने शेवटी गळ्यातले मंगळसूत्र फेकून दिले होते आणि मी तुझ्या बापाला सोडले तू माघारी ये म्हणून त्याला विनवण्या केल्या होत्या तरीही त्याने ऐकले नाही.
खवड्या डोंगराच्या मृत्यूच्या कड्यावर उभ्या राहिलेल्या मुलाला ओढून घेताना त्याच्या सकट खाली कोसळलेला बाप आणि एका क्षणामध्ये निर्णय घेऊन आता जगण्यात अर्थ नाही म्हणून त्या माऊलीने त्यांच्यापाठोपाठ अक्षरश: केलेला आत्मघात बघून डोळे पाणावले! मुलाचा आणि बापाचा अपघात म्हणता येईल परंतु आईने मात्र अक्षरशः आत्महत्या केली. इतका वेदनादायी मृत्यू कवटाळताना पाठीमागचे डोंगराएवढे लपलेले कौटुंबिक रहस्य फेसबुक मधल्या लेखांमधून किंवा instagram च्या रील मधून आणि न्यूज पोर्टलवरच्या बातम्या मधून कधीही कुणालाही सांगता येणार नाहीत!!
- अंजली झरकर














