LIVE UPDATES

सफाई आरोग्य विभागातील कमी केलेल्या ७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घ्या

नगरसेवक लुकेश कांबळे यांचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन; कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा आरोप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 28, 2026 20:44 PM
views 89  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सफाई आरोग्य विभागात काम करणाऱ्या सात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करत, या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक लुकेश कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित सात सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कणकवली शहराची साफसफाई करण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. हे कर्मचारी गरीब  असून, अचानक कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे नगरसेवक लुकेश कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे. कामगारांच्या हक्कांचा विचार करून अशा प्रकारे अचानक कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित सातही कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावे, तसेच कंत्राटदाराला नोटीस बजावून या प्रकाराबाबत खुलासा मागवावा, अशी मागणी कांबळे यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी संबंधित कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचना देऊन लेखी हमी घेण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात रोजगार हिरावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

सणासुदीच्या काळातच सात सफाई कर्मचाऱ्यांचा रोजगार गेल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नगरसेवक लुकेश कांबळे यांनी केली आहे.