LIVE UPDATES

7 सीटर एमजी हेक्टर टॉमहॉक कार 'लॉन्च', फ्यूल टॅंक अन् चार्जिंग फूल केल्यावर धावणार 1100 किमी

MG Hector Tomahawk PHEV : ७ सीटर असलेल्या 'हेक्टर टोमाहॉक प्लग-इन हायब्रिड' या एसयूव्हीमध्ये २०.५ किलोवॅटची बॅटरी आणि १.५ लिटर ॲटकिन्सन-सायकल पेट्रोल इंजिन आहे. जे इलेक्ट्रिक मोटरच्या संयोगाने काम करते.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 28, 2026 17:04 PM
views 61  views
MG Hector Tomahawk PHEV hybrid SUV

नवी दिल्ली : जेएसडब्लू एमजी मोटार इंडियाने भारतीय बाजारपेठेत 'हेक्टर टॉमहॉक प्लग-इन हायब्रिड' सादर केली आहे. कंपनीने BaaS (बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस) मॉडेल अंतर्गत या एसयूव्हीची किंमत २१.७९ लाख रुपये ठेवली आहे. यामध्ये प्रति किलोमीटर ३.२ रुपये इतके बॅटरीच्या भाड्याचा देखील समावेश आहे. तर तिची स्टँडर्ड एक्स-शोरूम किंमत २५.७० लाख रुपयांपासून सुरू होते.

७ सीटर असलेल्या 'हेक्टर टोमाहॉक प्लग-इन हायब्रिड' या एसयूव्हीमध्ये २०.५ किलोवॅटची बॅटरी आणि १.५ लिटर ॲटकिन्सन-सायकल पेट्रोल इंजिन आहे. जे इलेक्ट्रिक मोटरच्या संयोगाने काम करते.

फूल चार्ज आणि फूल इंधन केल्यानंतर या गाडीची रेंज १,१०० किमीपेक्षा जास्त असून केवळ इलेक्ट्रिकवर चालण्याची रेंज ११५ किमीपेक्षा जास्त असल्याचा दावा एमजीने केला आहे.

लॉन्च 'एक्सक्लुझिव्ह' व्हेरिएंटची स्टॅन्डर्ड एक्स शोरूम किंमत २५.७० लाख रुपये आहे, तर 'एसेन्स' व्हेरिएंटची किंमत २७.८० लाख रुपये आहे. याच्या पॉवरट्रेनमध्ये १०१ एचपी पॉवर आणि १२५ एनएम टॉर्क देणारे पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनला १९८ एचपी पॉवर आणि २३७ एनएम टॉर्क जनरेट करणाऱ्या 'परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर'ची जोड देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टीममध्ये '१०-इन-१ इंटेलिजंट इलेक्ट्रिक ड्राइव्ह युनिट'चा समावेश आहे आणि विशेष हायब्रिड ट्रान्समिशन ९८.८ टक्के इफिसिएन्शी देते. एमजी कंपनीच्या दाव्यानुसार, ही गाडी अवघ्या ९ सेकंदात ० ते १०० किमी/तास स्पीड गाठते.

५२-लिटरची इंधन टाकी आणि बॅटरीमुळे १,१०० किमीपेक्षा जास्त रेंज मिळते. यात सहा ड्राइव्ह मोड्स आहेत. 'प्युअर ईव्ही' मोडमध्ये इलेक्ट्रिक ड्रायव्हिंगसाठी बॅटरीचा वापर केला जातो, तर 'सिरीज हायब्रिड' मोडमध्ये मोटरसाठी वीज निर्माण करण्यासाठी पेट्रोल इंजिनचा वापर होतो. 'पॅरलल हायब्रिड' मोडमध्ये बूस्टसाठी इंजिन आणि मोटर या दोघांचाही वापर केला जातो.

'रिजनरेशन' मोडमध्ये गाडीचा वेग कमी होताना ऊर्जा पुनर्प्राप्त केली जाते. 'प्युअर इंजिन' मोडमध्ये इंजिनची शक्ती थेट चाकांना दिली जाते आणि 'इंजिन ड्राइव्ह + चार्ज' मोडमध्ये इंजिन एकाच वेळी चाके फिरवण्याचे आणि बॅटरी चार्ज करण्याचे काम करते.

यातील २०.५ किलोवॅट क्षमतेची बॅटरी ३.३ किलोवॅट एसी चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे ती १० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी साधारणपणे ७.५ तास घेते. तर २५ किलोवॅट डीसी चार्जिंगद्वारे ती ३० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी ३५ मिनिटे लागतात.

कारच्या प्रमुख फिचर्समध्ये ड्युअल-पेन कॉकपिट सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट, ६-वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ५० वॅट कूल्ड वायरलेस चार्जिंग, दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी एसी वेंट्स, १८-इंच अलॉय व्हील्स आणि 'मोरोक्कन ब्राऊन व कार्बन ब्लॅक' इंटिरिअर थीम यांचा समावेश आहे.