
सावंतवाडी : येथील उभाबाजार सुवर्ण पेठेत रात्रीचा पहारा देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रणबहादूर बोगाटी आणि जमनाबाई बोगाटी या नेपाळी गुरखा दांपत्याच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांची कन्या कु. रूपा बोगाटी हिने मुंबईत एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे.
सध्या ती मुंबईतील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. रणबहादूर यांच्या इतर मुलांनीही उच्च शिक्षण घेत विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या कुटुंबाच्या संघर्षात आणि यशात जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
सन २००१ मध्ये जमनाबाई यांच्या गंभीर आजारपणात मसुरकर यांनी पुढाकार घेऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया घडवून आणली होती. याच घटनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि मसुरकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर रुजू करून घेतले. या गुरखा कुटुंबाच्या मदतीपासून सुरू झालेला मसुरकर यांचा निस्वार्थी रुग्णसेवेचा प्रवास आज २६ वर्षे अविरत सुरू असून, जात-धर्म आणि राजकारणापलीकडे जाऊन गोरगरिबांची सेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.










