
सावंतवाडी : येत्या काही दिवसांत कोकण विभागात सुमारे पंचवीस हजाराहून जास्त शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या अनुषंगाने विधानपरिषदेचे आमदार आणि कोकणचे सुपूञ प्रमोद जठार यांनी भरती स्थानिकांतूनच झाली पाहिजे ही केलेली आग्रही मागणी स्तुत्य व स्वागतार्ह असून शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे असल्याचे ॲड. नकुल पार्सेकर यांनी सांगितले.
याबाबत ॲड. नकुल पार्सेकर यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे माहिती दिली. ॲड. पार्सेकर यांनी प्रसिध्दिपत्रकात असे नमूद केले आहे की, मुळात कोकणात रोजगाराच्या संधी कमी आहेत. त्यामुळे कोकणातील बेरोजगार युवक- युवती तुटपुंज्या पगारावर काम करण्यासाठी शहराकडे स्थलांतर करतात. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करू अशा घोषणा कोकणातील सगळेच नेते करत असतात. रिव्हर्स मायग्रेशन थांबले पाहिजे यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री प्रयत्न करत आहेत. हा येथील बेरोजगारांसाठी एक आशेचा किरण आहे.
आगामी शिक्षक भरती करताना कोकणातील बेरोजगार असलेल्या डी.एड, बी एड पात्र उमेदवारांचा प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे. स्थानिकांचा तो अधिकार असताना त्यांना डावलून बाहेरील उमेदवारांची भरती केली जाते. हा अन्याय असून याला आमदार जठार यांनी जाहीरपणे वाचा फोडली आहे. स्थानिकांची यामुळे वर्षानुवर्ष उपेक्षाच होते. जे बाहेरचे शिक्षक लादले जातात ते काही वर्षांनंतर आपल्या भागात बदली करून जातात, परिणामी पुन्हा शाळांमधील शिक्षकांच्या जागा रिक्त होतात आणि शिक्षणाचा खेळखंडोबा होतो.
कोकणातील स्थानिक भाषा, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबाबत स्थानिक शिक्षक सकारात्मक विचार करून आनंदाने आपले विद्यादानाचे कार्य करू शकतात असे ॲड. पार्सेकर म्हणाले.










