
सावंतवाडी : शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाबाबत गुरुवारी सायंकाळी दाभिल गावात झालेल्या सुनावणीत शक्तीपीठ महामार्गाला दाभिल वासियांनी तीव्र विरोध दर्शविला. तसेच या शक्तिपीठ महामार्गाची परिपूर्ण माहिती देऊनच सुनावणी घ्या असे संयुक्त निवेदन दाभिल ग्रामस्थांनी महसूलचे उपविभागीय अधिकारी तथा भू संपादन अधिकारी वीरसिंग वसावे यांना दिले. जिल्ह्यातील १४ गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जात असून दाभिल गावात झालेल्या या पहिल्याच सुनावणीत विरोध झाल्याने इतर गावातही विरोध होणार असल्याचे या सुनावणीतून अधोरेखित झाले.
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्य महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करण्यासाठी १९ जून रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर या महामार्गाच्या अधिसूचित जमिनीच्या संपादनाबाबत इतर १४ गावाप्रमाणेच दाभिल ग्रामस्थानी लेखी हरकत घेत आक्षेप नोंदवला. या हरकतीबाबत योग्य त्या पुराव्यानिशी आपले म्हणणे मांडण्यासाठी महसुल प्रशासनाने दाभिल गावात सर्वात पहिल्यांदा ही सुनावणी लावली होती. त्यादृष्टीने दाभिल ग्रामस्थानी ७/१२ उतारा, ८-अ चा उतारा, फेरफार पत्रक (म्युटेशन एंट्री), खरेदीखत, जमिनीचा नकाशा किंवा इतर संबंधित कायदेशीर कागदपत्रांसहया सुनावणीला उपस्थित होते.
या सुनावणीसाठी महसूलचे उपविभागीय अधिकारी तथा भु संपादन अधिकारी वीरसिंग वसावे, सावंतवाडीचे भूमिअभिलेख अधिक्षक ठाकरे, नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर, महसूल सहाय्यक अधिकारी पंकज मांजरेकर, मोनार्च कंपनीचे सर्वेअर प्रतिनिधी साईराज, तलाठी विजय कविटकर, ग्रामसेवक प्रफुल्ल धुरी, कोतवाल अशोक गावडे उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, भूमिअभिलेख अधिक्षक ठाकरे, नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांनी जोपर्यंतअंतिम सर्व्हे आणि प्रत्यक्ष मोजणी होत नाही तोपर्यंत प्रस्थापित महामार्ग नेमका कुठल्या जागेवरून जाणार हे स्पष्ट होणार नसल्याचे सांगितले. या शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेचे काम मोनार्च कंपनीकडे असून या कंपनीचे सर्वेअर प्रतिनिधी साईराज यांनी या शक्तिपीठ महामार्गाची रचना दाभिल ग्रामस्थांना लॅपटॉपवर दाखवली.
यावेळी दाभिल वासियांचावतीने भुमिका मांडताना शशिकांत गवस, अनिल गवस, भिकाजी घाडी, विष्णू घाडी, शशिकांत घाडी, शंकर निकम यांनी प्रथमतः प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची रचना, विस्तार याची पूर्ण माहिती द्यावी. बांधकाम कशाप्रकारे करणार ? बोगदे, पूल, मार्ग किती पदरी आहे? आमच्या गावातील देवस्थाने जात आहेत का? याची परिपूर्ण माहिती देऊनच सुनावणी घ्यावी. तसेच ही सुनावणी अति तातडीची नसून अति घाईने प्रक्रिया पूर्ण करून शक्तिपीठ महामार्ग आमच्या माथी मारू नये असे सांगत या शक्ती पीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला.
यावेळी दाजी तुकाराम घाडी, कृष्णा न्हानू घाडी, राजश्री लाडू राऊळ, सखाराम तुकाराम जाधव, बाबली महादेव राऊळ, विष्णू महादेव राऊळ, रमेश राऊळ विद्याधर घाडी भगवान राणे, अनिकेत जाधव, शिवप्रसाद देसाई, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गवस उपस्थित होते.










