LIVE UPDATES

शब्द दिला... शब्द पाळला! कोकणच्या उद्योगविश्वाला नवी दिशा”

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 21:37 PM
views 94  views

शंभरीकडे यशस्वी वाटचाल करणारी, उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित उद्योजकांची संस्था म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर. या संस्थेचे नेतृत्व अनेक मान्यवरांनी केले आहे. त्यामध्ये कोकणचे सुपुत्र आणि आशियातील सर्वाधिक उलाढाल असलेल्या शेड्युल्ड बँकेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. एकनाथजी ठाकूर यांचाही समावेश आहे.

गेल्या जून महिन्यात या संस्थेच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक पार पडली. नाशिक, कोकण आणि मुंबई वगळता अन्य ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली. बहुतांश ठिकाणी एकता पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा चेंबरचा अध्यक्ष झाला. आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडलेले, सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निरपेक्ष भावनेने काम करणारे मा. रविंद्रजी माणगावे हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून मला त्यांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली. भविष्याचा वेध घेत नियोजनबद्ध पद्धतीने काम कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्या या कार्यप्रवासात त्यांचे सहकारी आणि विशेषतः कोकणचे सुपुत्र, चेंबरचे तत्कालीन अध्यक्ष व ट्रस्ट बोर्डाचे चेअरमन मा. आशिषजी पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

जून महिन्यात झालेल्या निवडणुकीत एकता पॅनेलच्या माध्यमातून कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदासाठी डॉ. संतोष राणे, तर गव्हर्निंग कौन्सिलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात जागांसाठी मी स्वतः विजय केनवडेकर,  मनोज वालावलकर, राजन नाईक, विशाल कामत,  कुणाल वरसकर आणि  मिलिंद प्रभू असे आम्ही सात जण निवडणुकीच्या रिंगणात होतो. या निवडणुकीत आमच्या एकता पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला.

मात्र, मा. अध्यक्ष रविंद्र माणगावे यांचा उद्देश केवळ निवडणूक जिंकणे हा नव्हता. चेंबरची ध्येयधोरणे प्रामाणिकपणे राबवून उद्योगनिर्मिती आणि त्यातून रोजगारनिर्मिती हे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले. त्यातूनच ‘गाव तेथे उद्योजक’ हे महत्त्वाकांक्षी अभियान त्यांनी प्राधान्याने सुरू केले. या अभियानाची सुरुवात त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातून केली. या अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक म्हणून युनियन बँकेत वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्यरत असताना स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आणि आता चेंबरचे कोकण विभागीय उपाध्यक्ष असलेले डॉ. संतोष राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.

निवडणूक प्रचारादरम्यान कुडाळ येथे झालेल्या बैठकीत मा. माणगावे साहेबांनी जाहीर आश्वासन दिले होते की, निवडणूक संपल्यानंतर दोन महिन्यांत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे कोकण विभागीय कार्यालय सुरू करण्यात येईल.

ही घोषणा केवळ घोषणाच राहिली नाही, तर आज ती प्रत्यक्षात साकार होत आहे. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी या स्वप्नपूर्तीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे.

या स्वप्नपूर्तीमागे अनेकांचे योगदान आहे. डॉ. संतोष राणे यांनी यासाठी प्रचंड धडपड केली. त्यांच्या प्रयत्नांना चेंबरच्या वरिष्ठ नेतृत्वाने सकारात्मक प्रतिसाद दिला. कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मोहन होडावडेकर आणि सर्व पदाधिकारी, चेंबरचे सर्व सन्माननीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तसेच विशेषतः कोकणचे सुपुत्र व चेंबरचे तत्कालीन कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांचेही योगदान आणि परिश्रम निश्चितच उल्लेखनीय आहेत.

दिनांक १५ ऑगस्ट रोजी कुडाळ एम.आय.डी.सी. येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी आमदार निलेश राणे, आमदार दीपकभाई केसरकर, आमदार प्रमोद जठार तसेच अन्य लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

निवडणुकीच्या धामधुमीत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पाळली जातीलच, याची खात्री नसते. मात्र, आमच्या चेंबरच्या अध्यक्षांनी दिलेले आश्वासन कृतीत उतरवून कोकणातील उद्योजकांना एक सकारात्मक संदेश दिला आहे.

कोकण हा निसर्गसंपन्न, जैवविविधतेने परिपूर्ण आणि पर्यटनविकासासाठी प्रचंड क्षमता असलेला प्रदेश आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, मत्स्यव्यवसाय, कोकणी मेवा, विविध कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग तसेच बांबूला मिळणारे जागतिक बाजारपेठेचे वाढते महत्त्व लक्षात घेता, कोकणासाठी अशा विभागीय कार्यालयाची नितांत गरज होती.

मा. अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. या कार्यालयामुळे व्यापारी आणि उद्योजकांना आता एकाच छताखाली मार्गदर्शन, माहिती आणि आवश्यक सहकार्य मिळणार आहे. नव्या संधींची कवाडे खुली होणार असून स्थानिक कृषी व मत्स्य उत्पादनाला तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यास मदत होईल.

प्रशासकीय समन्वय साधण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून केले जाईल. शासन आणि उद्योजक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून हे कार्यालय कार्य करेल. उद्योजकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे, उपलब्ध शासकीय योजना आणि संधींची माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचवणे तसेच नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन देणे, यामुळे कोकणातील उद्योगविश्वाला निश्चितच नवी दिशा मिळेल.

राजकारण असो वा समाजकारण, दिलेला शब्द पाळणारे नेतृत्वच लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करते. हे मा. रविंद्र माणगावे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत ठोस कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे आणि आखलेला कार्यक्रम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो.

मा. रविंद्र माणगावे आणि मा. आशिषजी पेडणेकर यांच्या नेतृत्वामुळे कोकणातील व्यापारी, उद्योजक आणि नवउद्योजक यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ होतील. त्यातून कोकणच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.

मा. रविंद्र माणगावे यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह कोकणातील उद्योगजगत प्रगतीचे नवे शिखर गाठेल, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.

कोकणातील उद्योजकतेच्या नव्या पर्वाची ही केवळ सुरुवात आहे; या नव्या पर्वातून रोजगार, उद्योग आणि आर्थिक समृद्धीची नवी पहाट उगवेल, हीच अपेक्षा!


ॲड. नकुल पार्सेकर,

गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, सिंधुदुर्ग तथा कार्यवाह, कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन यांचा लेख