LIVE UPDATES

रानभाजी महोत्सव देशभरात पोहचवणार : वेदिका परब

उद्घाटनास विशाल परब, गौरव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 20:28 PM
views 19  views

सावंतवाडी : रानभाजी महोत्सव भविष्यात सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रासह देशभर नेण्याचा आपला संकल्प आहे. कोकणच्या मातीत निसर्गाने आपल्याला अतिशय समृद्ध अशी रानभाज्यांची परंपरा दिली आहे. या रानभाज्या केवळ आपल्या घरातील स्वयंपाकघरापुरत्या मर्यादित न राहता त्यांना व्यापक ओळख मिळाली पाहिजे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांनी व्यक्त केले. इन्सुलीतील राजभाजी महोत्सवाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ. विजय दळवी सहयोगी अधिष्ठाता, जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव विठ्ठल राणे, महेश शिवाजी सावंत, सचिन दळवी, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगावकर, महेंद्र पालव, साईनाथ राणे, मुख्याध्यापक शेवाळे, अजय कोठावळे, पालव यांची उपस्थिती होती.

त्या म्हणाल्या, महिलांच्या हातातील पारंपरिक पाककलेला योग्य व्यासपीठ, प्रशिक्षण, आधुनिक पॅकेजिंग आणि बाजारपेठ मिळाली, तर अनेक महिला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. इन्सुलीतील या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद ही पुढील वाटचालीची प्रेरणा आहे. हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्रासह देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा निर्धार सौ. परब यांनी व्यक्त केला.

‘रानभाज्यांना ग्लोबल मार्केट मिळू शकते’ : विशाल परब

दरम्यान, भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी कोकणातील रानभाज्यांकडे केवळ पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणून न पाहता त्यामध्ये मोठी आर्थिक, व्यावसायिक आणि निर्यातीची क्षमता असल्याचे सांगितले. कोकणातील रानभाज्या ही आपल्या निसर्गाची अमूल्य देणगी आहे. या भाज्यांचे योग्य संशोधन, दस्तऐवजीकरण, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मार्केटिंग झाले, तर या नैसर्गिक संपत्तीला देश-विदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते.

आज जगभरात नैसर्गिक, पारंपरिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रानभाज्यांसाठी ही योग्य संधी आहे. गावातील महिलांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि डिजिटल मार्केटिंगची जोड दिल्यास मोठे उद्योग उभे राहू शकतात. यातून महिलांना रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि कोकणच्या खाद्यसंस्कृतीला देश-विदेशात ओळख मिळू शकते,” असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

महोत्सवात शेकडो प्रकारच्या रानभाज्या तसेच विविध पारंपरिक पाककृतींचे दर्शन घडले. महिलांनी आपल्या पारंपरिक पाककौशल्यातून साकारलेल्या विविध पदार्थांनी उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आर्थिक आणि व्यावसायिक संधी मिळण्याची नवी वाटही खुली झाली आहे.

स्थानिक महिलांनी तयार केलेल्या रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने यांना थेट ग्राहक उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आठवडा बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आल्यास या उपक्रमाला आणखी व्यापक आर्थिक दिशा मिळण्याची शक्यता आहे. या रानभाज्या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सुत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर व शुभम धुरी यांनी केले. डॉ. विजय दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे संवर्धन आणि स्थानिक महिलांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

इन्सुलीतील या महोत्सवाने एक महत्त्वाचा संदेश दिला आह. कोकणच्या रानात उगवणारी प्रत्येक रानभाजी ही केवळ भाजी नसून ती परंपरा, आरोग्य, रोजगार आणि अर्थकारणाची संधी आहे. रानभाज्यांचे संवर्धन, त्यांच्या औषधी गुणधर्मांवर संशोधन, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, आकर्षक पॅकेजिंग आणि व्यापक मार्केटिंग यांची सांगड घातल्यास कोकणातील या नैसर्गिक संपत्तीला मोठी बाजारपेठ मिळू शकते.

त्याचबरोबर ग्रामीण महिलांच्या पारंपरिक ज्ञानाला व्यावसायिक रूप देऊन ‘घरगुती पाककलेपासून महिला उद्योजकतेपर्यंत’चा प्रवास घडवून आणता येऊ शकतो. यामुळे इन्सुलीचा रानभाज्या महोत्सव हा केवळ चव, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव न ठरता कोकणातील महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा देणारा आणि रानभाज्यांना स्थानिक बाजारपेठेपासून थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत नेण्याची क्षमता दाखविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.