LIVE UPDATES

शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मांडले विचार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 19:34 PM
views 14  views

देवगड : देवगड तालुक्यातील शेठ म. ग. हायस्कूल, येथे भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर आणि ज्येष्ठ शिक्षिका सौ. आरती खोत यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

यानंतर प्रशालेतील निवडक विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये वेदांत प्रकाश राऊळ, त्रिशा ओंकार पेडणेकर, स्पर्श कदम, निधी सावंत, पारस जोशी, तनिष सावंत आणि चैतन्य संतोष मुंबरकर यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व, वाचनामुळे होणारा ज्ञानविस्तार आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी आपले विचार मांडले.

यानंतर ज्येष्ठ शिक्षिका आरती खोत यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन केले.

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना बर्वे ग्रंथालयास भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या सभागृहात बसून विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन केले. तसेच ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेले पुस्तक प्रदर्शन पाहून विविध प्रकारच्या पुस्तकांची माहिती घेतली. पुस्तकांची मांडणी, विषयानुसार पुस्तकांचे वर्गीकरण आणि ग्रंथालयातील पुस्तक ठेवण्याची रचना यांचे विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण केले.

ग्रंथपाल प्रशांत बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे कामकाज, विविध शाखांची कार्यपद्धती तसेच ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकसंपदेची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे बालसभासद होऊन वाचनाची सवय विकसित करावी, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रंथपाल प्रशांत बांदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर कुंभरे यांनी केले.