
रत्नागिरी : रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तब्बल ११ लाख ३७ हजार रुपयांच्या 'इन्व्हेस्टमेंट फ्रॉड' (गुंतवणूक फसवणूक) प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाने यशस्वीपणे उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
या गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी महिला व त्यांच्या पतीशी व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) माध्यमातून संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना आयपीओ (IPO) व ओटीसी (OTC) ट्रेडिंगद्वारे अधिक परतावा मिळण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी वारंवार संपर्क साधून गुंतवणूक व ट्रेडिंगच्या कारणास्तव विविध बँक खात्यांमध्ये एकूण ११,३७,०१४ रुपये रक्कम जमा करण्यास भाग पाडले होते.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपी जेरेबंद
तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास पथकाने या गुन्ह्यातील मनी ट्रेलमधील आरोपी - दादासाहेब चौगुले (रा. सोलापूर) आणि ऑपरेटर ट्रेल तुषार चौधरी (रा. धाराशिव) असल्याचे निष्पन्न केले. तदनंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना रत्नागिरी येथे आणून न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल आदर्श इंगवले यांच्या तपास पथकाने पार पाडली आहे.
नागरिकांसाठी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
शेअर मार्केट, ट्रेडिंग व ऑनलाइन गुंतवणुकीत कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा.
अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स, WhatsApp व Telegram ग्रुप्सवर मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या टिप्सवर अजिबात विश्वास ठेऊ नका.
कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तिची सत्यता तपासा आणि खात्रीशीर परवानगी असलेल्या संस्थांमार्फतच गुंतवणूक करा.
जास्त परताव्याचे आमिष म्हणजे फसवणुकीचा इशारा असू शकतो.













