LIVE UPDATES

Ratnagiri News : रत्नागिरी शहरात १६ टपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

२,९०० रुपये दंड वसूल : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय भरारी पथकाची धडक मोहीम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 13:11 PM
views 23  views
Tobacco control inspection drive conducted by authorities in Ratnagiri

रत्नागिरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने १४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहर परिसरात जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकामार्फत धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा (कोटपा) २००३ अन्वये १६ टपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण २,९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान रोखणे, तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे, अल्पवयीन व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखणे तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ न देणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती तृप्ती घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अनिल गुंजे, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार श्रीमती रश्मी वायंगणकर आणि होमगार्ड मयूर पाडावकर यांच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली.

तंबाखू सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये आणि तंबाखू नियंत्रण कायद्याचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.