LIVE UPDATES

दाभोळेतील जलस्रोतांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा

ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 19:39 PM
views 252  views

देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचायत हद्दीतील जलस्रोतांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करून देवगड परिसरातील रस्त्याच्या कामासाठी पाणीपुरवठा केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक असल्यास संबंधित पाणी उपशावर निर्बंध घालावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दाभोळे तेलीवाडी येथील श्रीमती रुक्मिणी पाटील यांच्यामार्फत गावाच्या हद्दीतील जलस्रोतांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करून रस्त्याच्या कामासाठी उपलब्ध करून दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या माध्यमातून लाखो लिटर पाण्याचा उपसा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गावातील उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू राहिल्यास जलसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, त्याचा फटका ग्रामस्थांना बसू शकतो. गावातील नागरिकांना पिण्यासाठी, जनावरांसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित जलस्रोताची तातडीने स्थळपाहणी करून पाणीपातळी व उपलब्ध साठ्याची तपासणी करावी, तसेच पाणी उपशाचे प्रमाण आणि त्याचा वापर याबाबत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीअंती आवश्यक असल्यास लागू कायदेशीर तरतुदींनुसार मोठ्या प्रमाणातील पाणी उपसा बंद करण्याचे किंवा त्यावर निर्बंध घालण्याचे आदेश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

गावातील पिण्याच्या पाण्याच्या गरजेला प्राधान्य देऊन जलस्रोतांचे संरक्षण करावे, संबंधित विभागांच्या समन्वयातून पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे आणि या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांना लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी संदीप धुरी,उमेश राऊत, विजय कुळकर,संतोष मयेकर ,संतोष धुरी, रमेश घाडी, श्रीकृष्ण घाडी ,दयानंद घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.