LIVE UPDATES

स्ट्रीट लाईट विज तारेची चोरी करणाऱ्या महिलांना अटक

तीन महिलांचा सहभाग; त्यातील एक अल्पवयीन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 19:51 PM
views 32  views

कणकवली :  असलदे-गावठणवाडी येथून रामेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या बंद स्‍ट्रीट लाईटची वीज वाहक ॲल्‍युमिनिअम धातुची सुमारे १५० मीटर लांबीची अंदाजे पाच हजार पाचशे रुपये किंमतीची तार चोरी  करताना तिघेजण ग्रामस्‍थांना आढळून आले. त्‍यानंतर महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. याप्रकरणी महावितरणच्या तक्रारीवरून संशयित सनी मधू सकट (२१), राणी सनी सकट (२२, दोन्ही रा. सिद्धार्थनगर, कणकवली) व १७ वर्षीय मुलगी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२.४० वा. च्या सुमारास उघडकीस आली. 

याबाबतची फिर्याद महावितरणचे नांदगाव शाखा कार्यालयाचे कनिष्‍ठ अभियंता आकाश मधुकर बिडकर यांनी दिली. गुरुवारी दुपारी १२.४० वा. च्या सुमारास असलदे उपसरपंच सचिन परब यांनी त्‍यांना मोबाईलवर फोन करून असलदे गावठणवाडी येथून रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या स्‍ट्रीट लाईटची वीज वाहक तार, तीन इसमांनी तोडताना व चोरी करताना आढळून आले आहेत असे कळवले.

त्‍यानंतर श्री. बिडकर यांनी वायरमन सुनील इंदप यांना घटनास्‍थळी पाठवून पाहणी करून कळविण्यास सांगितले. श्री. इंदप यांनी पाहणी करून श्री. बिडकर यांना घटनास्‍थळी यायला सांगितले. त्‍यानंतर ते घटनास्‍थळी गेले त्‍यावेळी असलदे ग्रामस्‍थ त्‍याठिकाणी उपस्‍थित होते.

यावेळी सचिन परब यांनी त्‍यांना हकीकत सांगितली. दोन महिला व एक इसम हे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या बंद स्‍ट्रीट लाईटची तार तोडून चोरी करताना आढळून आले. याप्रकरणी संशयित सनी सकट, राणी सकट व एक अल्‍पवयीन युवती (रा. सिद्धार्थनगर, कणकवली) अशा तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यांच्याकडून चोरलेली तार व ॲक्‍टिव्हा स्‍कूटर जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास कासार्डे दुरक्षेत्राचे पोलिस करत आहेत.