
वेंगुर्ला : यात्रा विकास योजनेअंतर्गत तुळस श्री देव जैतीर मंदिर नजिक भक्तनिवास विस्तारीकरण व पेवर ब्लॉक बसविणे या विकास कामासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सभापती शंकर घारे यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात १५ लाख व दुसऱ्या टप्प्यात १० लाख रुपये असा एकूण २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकास कामाचे भूमिपूजन श्री देव जैतीर देवस्थानचे प्रथम मानकरी अनिल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, तुळस जि.प. सदस्य सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, ग्रा. पं. सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, चरित्रा परब, शिवसेना विभागप्रमुख संजय परब, तुळस माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार आप्पा परब, रामचंद्र परब, तुळस श्री देव जैतीर सोसायटी सचिव सुशील परब, विनय गोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नाना राऊळ, दिवाकर परब, के. डी. परब, प्रसाद घारे, सुधीर भगत, बाळू मेस्त्री, पप्प्या परब, दिलीप परब, बाळा परब आदीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांना नवी दिल्ली येथे 'महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड-२०२६' प्राप्त झाल्याबद्दल तुळस ग्रामस्थ यांच्या वतीने व तुळस सहकारी सोसायटीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनिष दळवी म्हणाले की, तुळस येथील जैतिर देवस्थानची ख्याती संपूर्ण राज्यात पसरली आहे. यामुळे हा भाग धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी व भाविकांच्या सुविधेसाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार २० लाखांचा निधी पुढील काळात पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात येईल. वेंगुर्ला तालुका पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असताना तुळस गावही धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे श्री दळवी यांनी सांगितले.
यावेळी सभापती शंकर घारे म्हणाले की, तुळस गावासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी विविध माध्यमातून भरगोस निधी दिला आहे. पलतड येथील शेतीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नदीवरील बंधाऱ्याला लाखो रुपये श्री दळवी यांच्या पाठपुराव्याने मंजूर होऊन भविष्यात अद्ययावत बंधारा त्याठिकाणी होणार आहे. यामुळे पुढील काळात जिल्हा बँक निवडणूक होत असून ती बिनविरोध व्हावी व पुन्हा एकदा मनिष दळवी यांना अध्यक्षपद मिळावे असे साकडे श्री जैतीर चरणी सभापती शंकर घारे यांनी घातले.













