
वेर्णा : येथे कोकण रेल्वे मार्गावर रो-रो वॅगन रुळावरून घसरल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले.
रेल्वे प्रशासनाच्या पथकांनी सुमारे चार तास प्रयत्न करून रुळावरून घसरलेल्या रो-रो वॅगनमुळे अडकलेला रेल्वे मार्ग पूर्ववत केला. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली.
दरम्यान, रो-रो वॅगन रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेमुळे रेल्वे मार्गाचे किंवा अन्य रेल्वे मालमत्तेचे किती नुकसान झाले आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची पाहणी आणि आवश्यक तपास केला जात असून, वॅगन रुळावरून घसरण्यामागील कारण स्पष्ट झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.













