LIVE UPDATES

महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा नारकर यांचा सावंतवाडी दौरा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 16:06 PM
views 33  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी सावंतवाडी तालुक्याचा दौरा करून तालुका बाल विकास प्रकल्प कार्यालय तसेच विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देत महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यामध्ये इन्सूली, वाफोली आणि बांदा येथील अंगणवाडी केंद्रांचा समावेश होता.

या दौऱ्यादरम्यान सभापती नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता व परिसराची पाहणी केली. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती घेतली.

अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयी-सुविधा आणि प्रलंबित बाबी याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना सभापती नारकर यांनी दिल्या. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अधिक गतिमानपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या दौऱ्यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव, लोकप्रतिनिधी, उपमुख्य कार्यकारी अधिकार प्रतीक उगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सावंतवाडी शैलजा मातोंडकर, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिला व बालकांच्या कल्याणासाठी अनेक शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी यावेळी सांगितले.