
नागपूर : मालवण तालुक्यातील काळसे गावचे सुपुत्र तथा पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी आपल्या टीमसह नागपूर येथील आपत्तीजन्य परिस्थितीत धाडसी कामगिरी करत अनेकांचे प्राण वाचविले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नागपूर गोधनी फागोजीनगर परिसरात क्लोरिन वायुगळती झाल्याची घटना रविवार 23 ऑगस्ट रोजी घडली होती . या पार्श्वभूमीवर काळसे गावचे सुपुत्र तथा मानकापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरेश काळसेकर यांच्यासह पोलीस पथकाने काही क्षणात घटनास्थळी धाव घेत परिसरातील दोनशे मीटर क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.
हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास क्लोरिन वायूची गळती झाल्याची माहिती मिळाली. पोलिस अधिकाऱ्यांनी मास्क लावून सर्वांच्या घराचे दार ठोठावत नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले.
मानकापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे मोठी जीवितहानी टळली असून पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर आणि संपूर्ण पोलिस पथकाचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.










