LIVE UPDATES

बँकेच्या सीडीएममध्ये भरल्या ५०० रुपयांच्या 13 बनावट नोटा

कांदोळी येथे घडला प्रकार : संशयित आरोपीचा शोध सुरु
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 17:59 PM
views 54  views

कांदोळी : कांदोळी येथील एका बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (सीडीएम) ५०० रुपयांच्या तब्बल १३ बनावट नोटा जमा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बँकेच्या सीडीएममध्ये जमा झालेल्या नोटांच्या तपासणीदरम्यान ५०० रुपयांच्या १३ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बँक व्यवस्थापनाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तसेच सीडीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बनावट नोटा जमा करणाऱ्या संशयिताची ओळख पटविली आहे. आता संबंधित संशयिताचा शोध घेऊन त्याची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या नोटा संशयिताकडे त्या चलनात कुठून आल्या, आणण्यामागे कोणाचा सहभाग आहे का आणि अशाच प्रकारे आणखी बनावट नोटा बाजारात आणल्या गेल्या आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

बनावट नोटांचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांकडून विविध बाजूंनी माहिती घेतली जात आहे. एकाच वेळी ५०० रुपयांच्या १३ बनावट नोटा बँकेच्या सीडीएममध्ये जमा झाल्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. तपासातून बनावट चलनी नोटांच्या व्यवहारामागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे.