LIVE UPDATES

महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची परीक्षा पुढे ढकलली

सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 13, 2026 05:01 PM
views 224  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन पत्रानुसार, कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार लेखी परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदभरती प्रक्रियेसंदर्भात देण्यात आलेली वयोमर्यादेची शिथिलता महसूल सेवक पदासाठी लागू करण्याबाबत शासन स्तरावर सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, राज्यातील इतर महसुली विभागांमध्ये निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित झालेल्या आणि कोकण विभागातील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा एकत्रितपणे घेण्याच्या अनुषंगाने सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या रिक्त पदांच्या स्थितीनुसार दिनांक २३ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुकानिहाय रिक्त जागांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक १ ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार करण्यात येईल. दिनांक १५ डिसेंबर रोजी परीक्षा भरती समिती स्थापन करून  दिनांक १६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जांची छाननी १ ते ७ जानेवारी २०२७ या कालावधीत करण्यात येईल.

पात्र उमेदवारांना दिनांक ८ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल. दिनांक १८ जानेवारी रोजी उत्तरसूची व निकाल जाहीर करण्यात येणार असून, दिनांक १८ ते २५ जानेवारी या कालावधीत दस्तऐवज पडताळणी होईल. अंतिम नियुक्तीपत्र दिनांक २६ जानेवारी २०२७ रोजी निर्गमित करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी इच्छुक व संबंधित सर्व परीक्षार्थींनी दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी परीक्षा होणार नसल्याची नोंद घ्यावी आणि सुधारित वेळापत्रकानुसार पुढील कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.