
नवी दिल्ली : डॉक्टर किंवा वैद्यकीय पदवीधर आपल्या वैद्यकीय व्यवसायासोबतच राष्ट्रसेवेचे कार्य करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 'आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस'ने 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन' अंतर्गत १२० पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र पुरुष आणि महिला डॉक्टरांना भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वैद्यकीय शाखांमध्ये अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. (Government Jobs)
जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण १२० जागांपैकी ९० जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि ३० जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी ९ नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइट 'join.afms.gov.in' वर जाऊन आपले अर्ज सादर करावेत.
सशस्त्र दलांमध्ये वैद्यकीय अधिकारी होण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांची 'स्टेट मेडिकल कौन्सिल' किंवा 'नॅशनल मेडिकल कमिशन'कडे कायमस्वरूपी नोंदणी असणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे ते उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.
एमबीबीएस (MBBS), पीजी डिप्लोमा (PG Diploma) केलेल्या उमेदवारांचे वय कमाल ३० वर्षे असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी (PG Degree) पात्र उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
या भरतीची सविस्तर अधिसूचना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर होणार असून ऑनलाइन अर्ज ९ नोव्हेंबर २०२६ पासून भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६ असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्जाचे शुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार शॉर्टलिस्टिंग केले जातील. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील 'आर्मी हॉस्पिटल' मध्ये मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत डिसेंबर २०२६ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या पूर्ण कराव्या लागतील. या सर्व आवश्यकता यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट join.afms.gov.in संकेतस्थळाला भेट द्या. होम पेजवर दिलेल्या भरती (recruitment) लिंकवर क्लिक करा. आवश्यक माहिती भरुन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा. आवश्यक डिटेल्स भरा आणि अर्ज सबमिट करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाचे शुल्क भरा. अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








