LIVE UPDATES

Cancer Medicines Price Cut in India : कर्करोगावरील १३७ औषधे स्वस्त

९६.४५ टक्क्यांपर्यंत किमतीत कपात : रुग्णांची वर्षाला ३,५४० कोटींची बचत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 07:53 PM
views 83  views

नवी दिल्ली : कर्करोगावरील १३७ औषधे ९ नोव्हेंबरपासून अधिक स्वस्त झाली आहेत. औषध कंपन्यांनी १२१ विविध औषधांशी संबंधित १,३६४ प्रकारच्या औषधी घटकांसाठी (फॉर्म्युलेशन्स) नवीन किमती जाहीर केल्या आहेत.

यापैकी ६७९ ब्रँडेड औषधांच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली असून, सर्वाधिक कपात ९६.४५ टक्क्यांपर्यंत आहे. या किमती कमी झाल्यामुळे रुग्णांची वार्षिक सुमारे ३,५४०.३८ कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी केलेल्या एका निरीक्षणांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. न्यायालयाने कर्करोगावरील औषधांच्या 'किंमत ते किरकोळ विक्रेता' आणि 'कमाल किरकोळ किंमत' यांच्यातील फरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. न्यायालयाने म्हटले होते की, ज्या औषधाची मूळ किंमत २,७०० रुपये आहे, ती रुग्णाला २७,००० रुपयांना विकणे म्हणजे "दिवसाढवळ्या लूट" आहे.

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेनंतर 'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी'ने १७ ऑक्टोबर रोजी एक आदेश जारी केला. या आदेशानुसार, कर्करोगावरील १३७ 'नॉन-शेड्युल्ड' औषधांच्या बाबतीत कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. या निर्णयामुळेच औषधांच्या किमतीत ही कपात झाली आहे.

या औषधांच्या किमती कमी करण्याची शिफारस 'डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस' अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एका तज्ज्ञ समितीने केली होती. या समितीत देशभरातील नामांकित कर्करोग तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालयातील विशेषज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीने नफ्याचे प्रमाण तर्कसंगत करण्याच्या उद्देशाने या १३७ औषधांची निवड केली होती. या यादीमध्ये वेळोवेळी सुधारणा किंवा अपडेट केली जातील.