LIVE UPDATES

ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामाचा फटका

दोडामार्ग-विजघर मार्गावर दोन ते तीन तास वाहतूक ठप्प : अरुंद पर्यायी रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 08:11 PM
views 75  views

दोडामार्ग : दोडामार्ग-विजघर राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे आंबेली-कोनाळकरवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने शेकडो वाहनधारकांना अडकून पडावे लागले. रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेली अपुरी पर्यायी व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या विरोधात प्रवासी, वाहनधारक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दोडामार्ग-विजघर मार्गाचे काँक्रीटीकरण गतवर्षापासून सुरू आहे. यंदा पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, आंबेली-कोनाळकरवाडी येथे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनांची ये-जा करताना अडथळे निर्माण होत आहेत. एका वेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, अशी व्यवस्था नसल्याने समोरासमोर वाहने आल्यावर वाहतूक खोळंबत आहे. त्यातच पर्यायी रस्त्यावर चिखल, खड्डे आणि खोदकामामुळे वाहनचालकांची अडचण वाढली आहे. काही वाहने चिखलात अडकली, तर काही ठिकाणी वाहनांना पुढे जाण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने परिस्थिती अधिकच बिघडली.

विशेष म्हणजे, बुधवारी भाऊबीजेचा सण असल्याने या मार्गावर प्रवाशांची वर्दळ होती. मात्र, रस्त्यावरील कामाचे योग्य नियोजन नसल्याचा फटका प्रवाशांना बसला. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सणानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. बस आणि खासगी वाहनांच्या रांगा लागल्याने संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला.

ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह

रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असताना वाहतुकीसाठी सुरक्षित आणि पुरेसा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात अरुंद आणि खराब पर्यायी रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक नियंत्रण, योग्य बॅरिकेडिंग आणि पर्यायी मार्गाची देखभाल याबाबतही नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित अभियंते यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकप्रतिनिधींचे दौरे सुरू; मात्र रस्त्यावरील समस्यांकडे दुर्लक्ष?

या मार्गावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी नियमित ये-जा करतात. असे असतानाही रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक समस्या आणि पर्यायी मार्गाची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास येत नाही का? लोकप्रतिनिधी केवळ विकासकामांच्या पाहणीपुरतेच मर्यादित आहेत का? असा प्रश्न या घटनेनंतर प्रवासी व वाहनधारकांमधून उपस्थित केला गेला.

जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. ठेकेदाराच्या कामावर नियंत्रण ठेवणे आणि संबंधित विभागाकडून योग्य नियोजन करून घेणे ही लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी आहे. मग भाऊबीजेच्या दिवशी शेकडो नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागेपर्यंत या समस्येची दखल का घेतली गेली नाही? असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे.