LIVE UPDATES

Sawantwadi Maha Arogya Shibir : सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिर

गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची संधी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 07:24 PM
views 66  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू आणि गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळावा, या उद्देशाने जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान, सावंतवाडी आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सावंतवाडी शहरातील उभाबाजार, ज्वेलरी पेठ येथील राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांच्या जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे.

या शिबिरामध्ये अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पात्र रुग्णांवर प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोल्हापूर येथील अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नियमानुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या शिबिरात हृदयविकार, बायपास सर्जरी, हृदयातील छिद्रावरील उपचार, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, हृदयाच्या झडपांची शस्त्रक्रिया, व्हेरिकोज व्हेन्स, हाडांचे आजार व शस्त्रक्रिया, मुतखडा, पित्ताशय, प्रोस्टेट, मणका, मेंदू तसेच कर्करोगावरील शस्त्रक्रियांसाठी रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय ईसीजी आणि रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे.

योजनेच्या पात्रतेनुसार शस्त्रक्रिया, औषधे आणि जेवणाचा खर्च योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

शिबिराला येताना रुग्णांनी आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, प्रधानमंत्री आयुष्मान भारत किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड, यापूर्वीचे सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच सध्या सुरू असलेली औषधे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी तालुक्यातील गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .