LIVE UPDATES

Sawantwadi News : सावंतवाडीत ‘सुरमयी दिवाळी पहाट’ची सुरेल मैफल

भक्तिसंगीत, नाट्यसंगीताच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 07:06 PM
views 63  views
Artists performing devotional songs and Marathi Natya Sangeet during the Surmayi Diwali Pahat musical programme in Sawantwadi.

सावंतवाडी : पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताचे स्वर, नाट्यसंगीताची भावस्पर्शी लय आणि लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल बरसात अशा संगीतमय वातावरणाने सावंतवाडीकरांची दिवाळी पहाट अधिकच मंगलमय झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीताच्या स्वरांतून सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाने सावंतवाडीच्या कलासंपन्न भूमीचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित केला.

यावेळी माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी, सावंतवाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असून, येथील नाटक आणि संगीताची समृद्ध परंपरा कायम टिकवून ठेवणे हेच आपले उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या सुंदर संगीत सोहळ्याचे आयोजन सावंतवाडीत केल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे त्यांनी आभार मानले. शेलार हे सावंतवाडीचे जावई असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सावंतवाडीतील सांस्कृतिक चळवळींमध्ये आणि नाट्यपरंपरेच्या जतनामध्ये आपल्या कुटुंबाचेही मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे वडील स्वतः नाटकांचे प्रयोग करीत असत. नाट्यकलाकारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच एकांकिका स्पर्धांच्या आयोजनासाठीही ते नेहमी सहकार्य करीत असल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या.सावंतवाडीची संगीत परंपरा आजही सद्गुरू संगीत विद्यालयाच्या माध्यमातून जिवंत आणि प्रवाही असल्याचे सांगताना त्यांनी गुरुवर्य निलेश मेस्त्री, किशोर सावंत आणि बाळ पुराणिक यांच्या योगदानाचा विशेष गौरव केला. निलेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उत्तम विद्यार्थी घडल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच आपण नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत ‘पाडवा पहाट’ या सांस्कृतिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गेल्या २१ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदा ‘सुरमयी दिवाळी पहाट’च्या माध्यमातून सावंतवाडीला सांस्कृतिक मेजवानी अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गुरुवर्य निलेश मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर संगीताच्या सुरेल मैफलीला प्रारंभ झाला. संगीत संयोजनाची जबाबदारी किशोर सावंत यांनी समर्थपणे सांभाळली, तर निलेश मेस्त्री यांनी हार्मोनियमवर सुरेल साथ दिली. तबलावादक निरज भोसले, अश्विन जाधव आणि मंगेश मेस्त्री यांनी आपल्या तालवादनातून मैफलीत रंग भरले.

संगीत शिक्षक व गायक नितीन धामापूरकर, गायिका वर्षा देवण, केतकी सावंत, समृद्धी सावंत आणि ॲड. सिद्धी परब यांनी आपल्या सुमधुर स्वरांतून नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी गीतांची मेजवानी सादर केली. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती.

सुरांच्या या अविस्मरणीय प्रवासाने उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या संगीत सोहळ्यास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, निवृत्त शिक्षक म. ल. देसाई, भरत गावडे, दीपक पटेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, ॲड. नकुल पार्सेकर, नायब तहसीलदार (निवडणूक) सविता कासकर, ‘सुरमयी दिवाळी पहाट’चे समन्वयक आर्यन देसाई, प्रा. प्रतिभा चव्हाण, मालवणी कवी दादा मडकईकर, सुधीर धुमे, कौस्तुभ पेडणेकर आदी मान्यवरांसह संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार सविता कासकर - तारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आर्यन देसाई यांनी मानले.