LIVE UPDATES

काट्याकुट्यांचा प्रवास अन् यशाचे 'घबाडकुंड'

बांद्याच्या वैष्णवीची रुपेरी पडद्यावर गगनभरारी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 13:35 PM
views 47  views

सिंधुदुर्गसाठी अभिमानास्‍पद 

सिंधुदुर्ग : स्वप्नांना अफाट मेहनतीचे पंख आणि प्रामाणिक प्रयत्नांचे आकाश मिळाले की, यशाची गगनभरारी कशी मारता येते, याचा जिवंत आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा सारख्या छोट्याशा शहरातून आलेल्या वैष्णवी कल्याणकर हिने दाखवून दिला आहे. संघर्षाच्या काट्यांवरून चालत, डोळ्यांतील स्वप्नांचे तेज उराशी बाळगून, बांदा गावची ही गुणी लेक आता थेट मराठी चित्रपटसृष्टीच्या भव्य आणि दैदिप्यमान रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू विखुरण्यासाठी सज्ज झाली आहे! नुकत्याच १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या 'घबाडकुंड' या बहुचर्चित आणि थरारक मराठी चित्रपटातून वैष्णवी एका मुख्य आणि नव्या उमेदीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

संघर्ष ते 'देवमाणूस-२' चा सुवर्णकाळ...

उच्च शिक्षणासाठी राज्याची राजधानी मुंबई गाठल्यानंतर, वैष्णवीने केवळ नोकरी-व्यवसायात न अडकता आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला जाहिराती, वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला.

'झी मराठी' वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'देवमाणूस- २' या मालिकेतील तिची 'सोनू' ही निष्पाप व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली. त्यानंतर 'तू चाल पुढं' या मालिकेत 'मयुरी वाघमारे' आणि 'टिकली' मालिकेतील तिच्या सोज्वळ व सहजसुंदर अभिनयाने तिने रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले.

दिग्गजांच्या मांदियाळीत बांदा गावच्या कन्येची चमक !

छोट्या पडद्यावर स्वतःचा ठसा उमटवल्यानंतर वैष्णवीने 'बॅम्बू' चित्रपटातून सिनेसृष्टीत दमदार पाऊल टाकले. आता रहस्य, साहस आणि अंगावर काटा आणणाऱ्या 'घबाडकुंड' या चित्रपटात ती मुख्य प्रवाहात दिसत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात तिला संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे आणि प्राजक्ता हणमघर यांसारख्या मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बर आणि कसलेल्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या दिग्गजांच्या मांदियाळीतही वैष्णवीने आपली भूमिका तितक्याच ताकदीने आणि लीलया साकारली आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या कलाकारांना अनेकदा योग्य व्यासपीठाअभावी मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, वैष्णवी कल्याणकर हिने स्वतःच्या प्रतिभेवर आणि सातत्यपूर्ण मेहनतीवर मुंबईसारख्या महानगरात जे यश मिळवले आहे, ते खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मालिकांमधून मिळवलेली घराघरातील प्रसिद्धी आणि आता चित्रपटांमधील दिग्गजांसोबतची तिची दमदार उपस्थिती ही तिच्यातील प्रगल्भ व कसदार अभिनयाची स्पष्ट पावती आहे. तिचा हा प्रवास कोकणातील इतर होतकरू कलाकारांना नक्कीच नवी ऊर्जा आणि दिशा देणारा ठरेल.