
सावंतवाडी : आंबोली, चौकुळ आणि गेळे या तीन गावांचा परिसर म्हणजे पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचा अनमोल ठेवा. केवळ पश्चिम घाटातच नव्हे, तर जगाच्या नकाशावर या परिसराची ओळख निर्माण करणाऱ्या असंख्य दुर्मिळ जीवसृष्टीचे हे अधिवासस्थान आहे. कोल्ह्यांचा कळप इथे मुक्त संचार करताना दिसून आला. सुमारे २६ प्रकारचे सस्तन प्राणी, २५० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती, २५० प्रकारचे पक्षी, १९ प्रकारचे बेडूक, तब्बल ५१ प्रकारचे साप, २०० हून अधिक बुरशीच्या प्रजाती तसेच असंख्य औषधी वनस्पती आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतीसंपदा या परिसराचे जैववैभव अधोरेखित करतात. याच जैवविविधतेने नटलेल्या चौकुळ परिसरात चार कोल्ह्यांचा कळप मुक्तपणे बागडताना दिसला. भरपावसात रस्त्याच्या अगदी कडेला हे लाजरे-बुजरे प्राणी एकमेकांसोबत खेळण्यात दंग झाले होते. त्यांचा हा निरागस खेळ पाहून उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा अनुभव आला. निसर्गप्रेमी काका भिसे यांनी हा दुर्मीळ आणि मनमोहक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला असून, कोल्ह्यांचा मुक्त बागडण्याचा हा व्हिडिओ आता या परिसराच्या समृद्ध जैवविविधतेची साक्ष देत आहे.










