LIVE UPDATES

Ramayan : ब्रह्ममुहूर्तावर रिलिज होणार 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर, प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

Ramayana Trailer Release : चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून ही घोषणा केली. हिंदू धर्मात पहाटे ४ ते ५ या वेळेला 'ब्रह्ममुहूर्त' मानला जातो आणि कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 29, 2026 16:40 PM
views 56  views

Ramayana 2026 Trailer Date : बहुप्रतिक्षित नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलरची चाहत्यांना प्रतीक्षा लागली होती. ट्रेलर कधी रिलिज होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. निर्मात्यांनी मंगळवारी ट्रेलरची तारीख जाहीर केली आहे.

हिंदू परंपरेत अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या 'ब्रह्ममुहूर्ता'शी जुळवून घेण्यासाठी निर्मात्यांनी हा ट्रेलर ३० जुलै रोजी पहाटे ४:१५ वाजता जगभरात प्रदर्शित केला जाईल अशी घोषणा केली आहे. याबाबतची माहिती पोस्टद्वारे इंन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली. नवीन पोस्टर जारी करताना निर्मात्यांनी म्हटले आहे की, "आम्ही शुभ ब्रह्ममुहूर्तावर आमच्या ट्रेलरद्वारे 'रामायण'च्या महाकाव्याचा उद्य साजरा करणार आहोत."

चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून ही घोषणा केली. हिंदू धर्मात पहाटे ४ ते ५ या वेळेला 'ब्रह्ममुहूर्त' मानला जातो आणि कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते. भारतीय संस्कृतीतील सर्वात महान महाकाव्यांपैकी एकावर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही, असे निर्मात्यांचे मत आहे. हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे ४,००० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे, त्यामुळे हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 'दंगल'चे दिग्दर्शक नितेश तिवारी याचे दिग्दर्शन करत आहेत.

चित्रपटात 'या' कलाकारांच्या महत्वाचा भूमिका 

रामायण'मध्ये बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. प्रभू श्रीरामाची भूमिका रणबीर कपूर तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत असेल. तसेच सनी देओल हनुमानाची आणि रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेराय आणि कुणाल कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १९८७ मधील 'रामायण' या टीव्ही मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल या चित्रपटात राजा दशरथाच्या भूमिकेत दिसतील.