
कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन तसेच ‘गाव तेथे उद्योजक’ या अभियानाचा शुभारंभ शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील झाराप झिरे पॉईंटजवळील हॉटेल आराध्या येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास कॅबिनेट मंत्री नितेश नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी आमदार दीपक केसरकर, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि कोकण विभागातील विविध पदाधिकारी व उद्योजकही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
‘गाव तेथे उद्योजक’ या अभियानाच्या माध्यमातून कोकणातील गावागावांत उद्योजकता वाढविणे, स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करणे आणि नव्या उद्योजकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, या कार्यक्रमाला उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










