आमीर खानच्या सितारे जमीन परने बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला जमवला आहे. आमीरच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी हा सिनेमा नेट कलेक्शनच्या रेसमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सहावा सिनेमा बनला आहे. या सिनेमाने आतापर्यंत सगळ्या भाषेतील एकत्रित मिळून 122.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाच्या हिंदी भाषेतील सिनेमाचे योगदान 121.88 कोटी इतके आहे.
विशेष म्हणजे 2008ला रिलीज झालेला सिनेमा गजनीच्या कमाईलाही सितारे जमीन पर मागे टाकले आहे. गजनी सिनेमा भारतीय सिनेमाच्या यशाचा मानदंड मानला जातो. कारण कमाईच्याबाबत 100 कोटी क्लबची सुरुवात करणारा तो पहिला सिनेमा ठरला होता. 2022 मध्ये लाल सिंह चढ्ढाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ल्यानंतर हा सिनेमा जणू आमीरचा कमबॅक सिनेमा ठरला आहे म्हणल्यास चुकीचे होणार नाही. कारण लाल सिंह चढ्ढाने रिलीज झाल्यानंतर केवळ 61.12 कोटींची कमाई केली होती.
सामाजिक प्रश्नांना भावनिक पद्धतीने हाताळणारे सिनेमे ही आमीरची आधीपासूनची खासियत आहे. मग ते तारे जमीन पर असो किंवा पीके. सितारे जमीन परने पहिल्या शुक्रवारी 10.7 रुपयांची कमाई केली जी बऱ्यापैकी समाधानकारक होती. तर शनिवारी 20.2 कोटी आणि रविवारी 27.25 कोटींची कमाई केली होती. पण अपेक्षेप्रमाणे या सिनेमाने सोमवार, मंगळवार फारसा व्यवसाय केला नाही. पण वीकएंडला मात्र काही दिवसांची कमतरता भरून काढली.