
सावंतवाडी : ‘कोकणसाद’ कोकणच्या घराघरांत पोहोचलेले दैनिक आहे. आनंद आणि श्रद्धेचे प्रतिक म्हणजे गणेशोत्सव. देशाच्या कानाकोपर्यातून भाविक या निमित्ताने कोकणात येतात. येणारे वर्ष गणेशाच्या कृपेने सिंधुदुर्गसाठी नक्कीच लाभदायक असेल, असा विश्वास माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ‘कोकणसाद’च्या आरती संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ‘कोकणसाद’चा आरती संग्रह गणेशभक्तांसाठी पर्वणीच असतो, असे ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, शिवसेना उप जिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, मुख्य उपसंपादक स्वप्नील परब, उपसंपादक लक्ष्मण आढाव, चीफ रिपोर्टर विनायक गांवस, कुडाळ प्रतिनिधी निलेश ओरसकर, विद्देश धुरी, अश्फाक शेख, अविनाश बांदेकर, रविकिरण राणे, मेघनाथ सारंग यांच्यासह ‘कोकणसाद’ची टीम उपस्थित होती.
दीपक केसरकर पुढे म्हणाले, ''सावंतवाडी न.प. साठी १३ कोटींचा निधी आम्ही मंजूर केला आहे. जिल्ह्याच्या विकास सध्या झपाट्याने होत असून आमदार निधीतून सावंतवाडीसाठी मी जास्तीत जास्त निधी देत आहे. आंबोली, चौकुळ येथील जमिनीचे वाटप देखील लवकरच होणार असून हा भाग आंतरराष्ट्रीय डेस्टीनेशन म्हणून नावारूपास येणार आहे. मल्टीस्पेशालिटीचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार असून चांगली सेवा याठिकाणी उपलब्ध होणार आहे.''
''खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे याच्या प्रयत्नातून मेडीकल कॉलेज देखील पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. मी अनेक निर्णय जिल्ह्यातील तळागाळातील लोकांसाठी घेतले असल्याचे ते म्हणाले. शिवाय आर्किला हे फाईव्हस्टार हॉटेल कार्यरत झाले आहे. ताज देखील लवकरच उभे राहणार आहे. त्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्हयातील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे'', असे श्री. केसरकर म्हणाले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, ‘कोकणसाद’तर्फे नवनवीन उपक्रम नेहमीच राबविले जातात. सर्व टीम लोकांपर्यंत विश्वासार्ह आणि हटके बातमी पोहोचविण्यासाठी नेहमीच कार्यरत असते, असे त्या म्हणाल्या,
युवराज लखमराजे भोसले म्हणाले, कोकणसादने वाचक मन खर्या अर्थाने जोडले आहे. त्यामुळेच युट्यूब चॅनेलने ४ लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आणि आता फेसबुकवरही या चॅनेलचा डंका कायम आहे. नवनवीन उपक्रम राबवून वाचकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न या चॅनेलच्या माध्यमातून नेहमीच होतो, असे ते म्हणाले.
शिवसेना उप जिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर म्हणाले, सिंधुदुर्गात सर्वांत प्रथम डिजीटल मिडिया आणण्यात कोकणसादचे संपादक सागर चव्हाण यांचा वाटा आहे. आतापर्यंत अनेक उपक्रम कोकणसाद राबवत असते आणि ते लोकाभिमुख असेच असतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘कोकणसाद’चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन ‘कोकणसाद LIVE’च्या मुख्य उपसंपादक जुईली पांगम यांनी केले. चीफ रिपोर्टर विनायक गांवस यांनी आभार मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










